अटलजींच्या बंगल्यात राहणार अमित शहा


नव्याने सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमधील मंत्री, खासदारांना दिल्लीत सरकारी निवासस्थाने देण्याबाबत विचार सुरु असताना गृहमंत्री अमित शहा यांना दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे ६ ए, कृष्णमेनन मार्ग वरील निवासस्थान दिले गेले असल्याचे समजते. अटलजी पंतप्रधान पदावरून पायउतार झालेल्या दिवसापासून त्यांच्या मृत्यूपर्यंत याच बंगल्यात राहत होते. २००४ ते २०१८ या काळात ते येथे राहत होते आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अटलजींच्या निधनानंतर म्हणजे १६ ऑगस्ट नंतर हा बंगला नोव्हेंबर मध्ये रिकामा केला होता.

१७ व्या लोकसभेत भाजप ५४२ पैकी ३०३ जागा जिंकून प्रचंड बहुमताने सत्तेत आली आहे. या विजयात अमित शहा यांचे योगदान खूपच मोठे आणि महत्वाचे आहे. आता मोदी सरकारमध्ये त्यांच्यावर गृह या अत्यंत महत्वाच्या मंत्रालयाची जबाबदारी आहे. वास्तविक अमित शहा राज्य सभेचे सदस्य असून त्यांची ही मुदत २०२३ पर्यंत आहे. राज्यसभा खासदार म्हणून ते सध्या अकबर रोड वरील बंगला नंबर ११ येथे राहत आहेत. मात्र आता ते लोकसभेवर निवडून गेले आहेत. टाईप ८ श्रेणीतील अटलजींचे वास्तव्य झालेला हा बंगला अमित शहा यांच्यासाठी दुरुस्त करून तयार केला जात असून त्यासाठी कदाचित महिनाभर वेळ लागणार आहे. अमित शहा यांनी या बंगल्याला भेट देऊन त्यांच्या सुरक्षेच्या गरजेनुसार बंगल्यातील दुरुस्त्या सुचविल्या आहेत असेही समजते.


अटलजी ज्या बंगल्यात राहत होते तेथेच निधनानंतर त्यांचे स्मृतीस्थळ करावे अशी मागणी यापूर्वी केली गेली होती. मात्र अटलजी पंतप्रधान असतानाचा म्हणजे २००० साली वाजपेयी सरकारने राष्ट्रीय नेत्यांच्या निधनानंतर सरकारी निवासस्थानाचे स्मृतीस्थळात रुपांतर करू नये असा ठराव केला होता. त्यानुसार चौधरी चरणसिंग हे राहत असलेल्या १२ तुघलक रोड निवासस्थानाचे स्मृतीस्थळ करावे अशी त्यांच्या चिरंजीवानी म्हणजे अजित सिंग यांनी केलेली मागणी मान्य केली गेली नव्हती. तसेच अटलजी यांचे स्मृतीस्थळ राजघाटावर सदैव अटल या नावाने विकसित करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार या बंगल्याचा पहिला नंबर ८ कृष्ण मेनन मार्ग असा होता आणि नरसिंहराव सरकारमध्ये अर्थमंत्री असताना मनमोहन सिंग या घरात १९९१ ते ९६ या काळात राहिले होते. अटलजी येथे राहायला येण्याचे ठरल्यावर ८ हा नंबर अटलजींसाठी लकी नसल्याने त्याचा नंबर ६ ए कृष्ण मेनन मार्ग असा केला गेला होता.

Leave a Comment