हुबेहूब ‘ बार्बी ‘ सारख्या दिसणाऱ्या या तरुणीला घराबाहेर पडण्यास बंदी


आपण सुंदर दिसावे हे इच्छा कोणत्या तरुणीची असत नाही? काही तरुणी तर आपल्या मनाजोगते सौंदर्य मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात. डायटटिंग, निरनिराळी महागडी सौंदर्य प्रसाधने, ब्युटी थेरपीज, इतकेच नव्हे, तर काही तरुणी तर निरनिराळ्या शस्त्रक्रिया ( प्लास्टिक सर्जरी ) करून घेण्यासही मागे पुढे पहात नाहीत. पण रशिया मधील एक तरुणी या पैकी कोणत्याही उपायांचा अवलंब करीत नाही. आपली फिगर चांगली राखण्याकरिता ती कोणते डायट करीत नाही, किंवा सौंदर्य प्रसाधनांचा वापर देखील करीत नाही. तरीही ही तरुणी इतकी देखणी आहे, की तिला सगळे जण ‘ बार्बी ‘ म्हणतात. ‘ बार्बी ‘ या अतिशय सुंदर दिसणाऱ्या बाहुलीप्रमाणे ही तरुणी दिसत असल्याने तिला हे नाव दिले गेले आहे.

या तरुणीचे खरे नाव आहे अँजेलिका केनोव्हा. रशिया देशाची नागरिक असलेली ही तरुणी आपली छायाचित्रे फेसबुक आणि इन्स्टाग्राम सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रसिद्ध करीत असते. तिच्या देखण्या रूपामुळे अँजेलिका आता रशियामधील प्रसिद्ध मॉडेल बनली आहे. पण कामाव्यतिरिक्त अँजेलिका ला घराबाहेर पडण्याची मनाई तिच्या परिवारातील सदस्यांनी केली आहे. अँजेलिका जेव्हा घराबाहेर पडते, तेव्हा तिचे चाहते तिला पाहण्यासाठी एकच गर्दी करीत असतात, त्यामुळे कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणास्तव अँजेलिका घराबाहेर क्वचितच दृष्टीस पडते.

२६ वर्षीय अँजेलिकाचे असंख्य चाहते आहेत. तिच्या फेसबुक पेज वर तिच्या फॉलोअर्सची संख्या ४०, ००० पेक्षा ही अधिक असून, इन्स्टाग्राम वर तिचे ९५,००० पेक्षा ही अधिक फॉलोअर्स आहेत. अँजेलिकाच्या रूपाची भुरळ पडून अनेक तरुण तिला प्रेमसंदेशही पाठवत असतात. अश्या या रूपसुंदर तरुणीला तिच्या चाहत्यांच्या गराड्यापासून लांब ठेवण्यासाठी अँजेलिकाची आई सतत प्रयत्नशील असते. अँजेलिकाला कोणतीही वस्तू हवी असल्यास तिची आई स्वतः बाजारातून ती वस्तू अँजेलिकाला आणून देते. तिची एकंदर बडदास्त बघून तिला कैद करून तर ठेवण्यात आले नाही ना असा ही विचार तेथील लोकांच्या मनामध्ये डोकावतो, पण आपल्या आईवडिलांना आपली सतत काळजी वाटत असते, आणि त्या काळजी पोटीच ते आपल्याला घराबाहेर पडू देत नाहीत, असे अँजेलिका सांगते.

Leave a Comment