अफ्रिकेविरोधातील सामन्यात रोहित शर्माचा भीमपराक्रम !


भारताने विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने झळकावलेल्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर विजय संपादन केला. भारताने आफ्रिकेवर ६ गडी राखून मात करत स्पर्धेची धडाकेबाज सुरुवात केली. या सामन्यात मुंबईकर रोहित शर्माने १४४ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. त्याला त्याच्या या खेळीसाठी सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आले. रोहित शर्माने या खेळीदरम्यान अनेक विक्रमांची नोंद आपल्या नावावर केली आहे.

रोहित शर्मा भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. रोहितने आफ्रिकेविरुद्ध आपल्या एकदिनवसीय कारकिर्दीतील २३ वे शतक झळकावले. सचिन तेंडूलकर या यादीमध्ये ४९ शतकांसह पहिल्या तर ४१ शतकांसह दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने माजी कर्णधार सौरव गांगुलीचा २२ शतकांचा विक्रम मोडीत काढला.

आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने १२८ चेंडूंमध्ये आपले शतक साजरे केले. त्याच्या २३ शतकांपैकी हे सर्वात धीम्या गतीने झळकावलेले शतक ठरले. विश्वचषक इतिहासात रोहित शर्माचे शतक हे भारतीय खेळाडूने झळकावलेले २६ वे शतक ठरले. विश्वचषक स्पर्धेतत आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांच्या खेळाडूंनीच २६ शतके झळकावली आहेत.

रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (एकदिवसीय, कसोटी आणि टी-२०) १२ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा नववा फलंदाज ठरला आहे. रोहित शर्माच शतक हे भारतीय खेळाडूचे विश्वचषक स्पर्धेतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोत्तम शतक ठरले आहे. सचिन तेंडुलकरने १९९६ च्या विश्वचषकात स्पर्धेत केनियाविरुद्धच्या सामन्यात नाबाद १२७ धावा केल्या होत्या. तो अजुनही पहिल्या स्थानावर कायम आहे.

रोहित शर्मा धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर पोहचला आहे. रोहित शर्माचे आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हे शतक धावांचे पाठलाग करतानाचे ११ वे शतक ठरले. या यादीमध्ये रोहितच्या पुढे विराट कोहली २५ शतके, सचिन तेंडुलकर १७ शतके, ख्रिस गेल १२ शतके, तिलकरत्ने दिलशान ११ शतके हे फलंदाज आहेत. कर्णधार विराट कोहलीचा आफ्रिकेविरुद्धचा विजय हा ५० वा विजय ठरला. ६९ एकदिवसीय सामन्यांमध्ये विराटने ही कामगिरी करुन दाखवली आहे. आफ्रिकेची विश्वचषक इतिहासात सुरुवातीचे ३ सामने गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.

Leave a Comment