अन्न-औषध प्रशासनाने ताब्यात घेतली सांगलीच्या बाजारातील प्लास्टिक अंडी


सांगली – गेल्या काही महिन्यांपासून प्लास्टिकची अंडी बाजारात आल्याची चर्चा सुरू असतानाच सांगलीच्या बाजारात नकली अंडी सापडल्यामुळे पुन्हा एकदा नकली अंड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही अंडी बुधगावमधील एका दुकानात आढळली असून अन्न-औषध प्रशासनाने या प्रकरणी कारवाई करून प्लास्टिकची सर्व अंडी ताब्यात घेतली आहेत.

रात्रीच्या जेवणासाठी सांगलीच्या बुधगावमधील युवराज साठे यांनी अंड्यांचा बेत आखला होता. त्यांच्या लहान मुलाने यासाठी गल्लीतीलच भाकरे किराणा स्टोअर्समधून ६ अंडी विकत आणल्यानंतर ती अंडी शिजवण्यासाठी साठे यांच्या पत्नीने पातेल्यात टाकून गॅसवर ठेवली. काही वेळातच पाणी गरम झाले आणि त्यामधील अंडी फुटून पाण्यावरती तरंगू लागली आणि त्या पाण्याला पांढरा फेस येऊ लागला.

पाण्यावर शिजलेली अंडी कधीही तरंगत नाहीत किंवा पाण्याला फेस येत नसल्यामुळे साठे घाबरल्या आणि त्यांनी पतीला ही बाब लक्षात आणून दिली. साठे यांनी यानंतर आपल्या काही मित्रांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला. त्यानंतर भाकरे किराणा स्टोअर्समधून आणखी पाच अंडी आणली आणि त्यातील चार अंडी शिजवून पहिली. मात्र, पुन्हा तोच प्रकार घडला. पाणी जसे गरम होईल, तशी अंडी फुटू लागली आणि पाण्यावरती तरंगू लागली. त्यानंतर पाण्यातून अंडे बाहेर काढून त्याचे कवच जाळले असता, ते प्लास्टिकसारखे जळू लागले आणि त्याचा वास देखील येऊ लागला.

साठे यांनी त्यानंतर एक कच्चे अंडे फोडून वाटीमध्ये ओतले असता, त्याच्या आतील पांढरा आणि पिवळा बलक वाटीमध्ये एकरूप झाला. वास्तविक खऱ्या अंड्यामध्ये तसे होत नाही. भाकरे यांनी या बाबत किराणा स्टोअर्सच्या मालकास विचारणा केली. त्यावर आपण ही अंडी एका विक्रेत्याकडून आणल्याचे सांगितले. याबाबत अन्न औषध प्रशासनाकडे तक्रार करत ही अंडी नकली व बनावट असल्याचा दावा साठे यांनी केला आहे. यानंतर अन्न औषध प्रशासनाने बुधगावमधील दुकानदार भाकरे यांच्या घरातील अंड्याची तपासणी करत अंड्याच्या साठा ताब्यात घेतला आहे. त्यानंतर ही अंडी तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे. मात्र, या प्रकारामुळे नकली अंड्यांच्या विक्रीचा प्रश्न ऐरणीवर आला असून तपासणीनंतर हे सर्व अंडी खरेच नकली आहेत का? हे समोर येणार आहे.

Leave a Comment