भाजप आता विद्यमान आमदारांचे देखील कापणार तिकीटे


मुंबई – लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप विद्यमान आमदारांचीही तिकीट कापणार असल्याची चर्चा भाजपच्या गोटात असल्याने अनेक आमदारांचे धाबे दणाणले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात अनेक विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आमदारांची जिंकून येण्याची स्तिथी नसल्याचे या सर्वेक्षणात समोर आले होते. यामध्ये 1-2 नाही तर तब्बल 30 टक्के विद्यमान आमदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर भाजपमध्ये इतर पक्षातून दाखल होणाऱ्या बड्या नेत्यांना सामावून घेण्याचे मोठे आव्हानही भाजप समोर आहे.

गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्याआधी ऑक्टोबर महिन्यात भाजपने पक्षाचे खासगी सर्वेक्षण करून घेतले होते. काही खासदारांची स्तिथी या सर्वेक्षणात चांगली नसल्याने राज्यातील 5 विद्यमान खासदारांची तिकीटे कापली गेली होती. अहमदनगर मतदार संघाचे दोनदा प्रतिनिधित्व करणारे माजी खासदार दिलीप गांधी आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते यांचा पराभव करून जायंट किलर ठरलेले शरद बनसोडे यांचा ही यामध्ये समावेश होता. तर दिंडोरीचे हरीशचंद्र चव्हाण यांनाही डच्चू देऊन राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेल्या भारती पवार यांना संधी देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर काही विद्यमान आमदारांना आता विधानसभेतही डच्चू मिळण्याची शक्यता असून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येणार आहे. मुंबई प्रदेश कार्यालयात गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात संबंधित आमदारांना बंद पाकिटात स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांचा सर्वे रिपोर्ट दिला होता. आता पक्षाने लोकसभा निवडणुकीत घेतलेली भूमिका यशस्वी ठरली असून हीच भूमिका आगामी विधानसभेतही घेण्यात येणार आहे. भाजपचे नेते यासंदर्भात काहीही बोलण्यास तयार नाही. पण भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार हे निश्चित असल्याचे भाजपच्या गोटात जोरदार चर्चा आहे.

दरम्यान कोणाकोणाची तिकीटे कापली जाणार याबाबतची चर्चाही चांगलीच चर्चा रंगली आहे. विद्यमान आमदारांचे जे सर्वेक्षण अहवाल सादर केले गेले आहेत. यामध्ये अनेक आमदारांच्या मतदारसंघात भाजपची अवस्था चांगली नसल्याचे निदर्शनास आल्याने त्या मतदारसंघात भाजपकडून विशेष लक्ष दिले जाणार आहे.

Leave a Comment