आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात धोनीने घातलेल्या ग्लोव्ह्जवर होते विशेष चिन्ह


विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिला सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने काल दक्षिण आफ्रिकेवर ६ गडी राखून मात केली. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने नाबाद शतकी खेळी करत विजयात मोलाचा वाटा उचलला. पण भारताचा यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने कालच्या सामन्यात आपल्या अनोख्या कृतीमुळे पुन्हा एकदा सर्वांची मने जिंकून घेतली.

आपल्या यष्टीरक्षक ग्लोव्ह्जवर महेंद्रसिंह धोनीने एक खास चिन्ह लावले होते. विशेष म्हणजे कोणालाही हे चिन्ह वापरण्याची परवानगी मिळत नाही. ‘बलिदान चिन्ह’ असे या चिन्हाला म्हटले जाते, हे चिन्ह वापरण्याची परवानगी फक्त पॅरा कमांडोजच्या सदस्यांना मिळते. हे विशेष बलिदान चिन्ह पॅरा कमांडोजच्या पॅराशूट युनिटकडे असते. देवनागरी लिपीमध्ये ‘बलिदान’ असे या चिन्हावर लिहीलेले असते चांदीपासून हे चिन्ह बनवलेले असते. लाल रंगाच्या प्लास्टिकचे आवरणही या चिन्हावर असते.

भारतीय लष्करातर्फे २०११ साली महेंद्रसिंह धोनीला मानाची लेफ्टनंट कर्नल ही पदवी बहाल करण्यात आली होती. यासोबत धोनीने पॅराट्रूपिंगचेही प्रशिक्षण घेतले आहे. भारतीय सैनाच्या १०६ पॅराशूट रेजिमेंटचा धोनी सदस्य आहे. धोनी २०१५ साली प्रशिक्षण घेऊन पारंगत पॅराट्रूपर बनला होता. म्हणूनच धोनी हे विशेष बलिदान चिन्ह असलेले ग्लोव्ह्ज आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात घालून मैदानात उतरला होता.

Leave a Comment