रोनाल्डोची नवी हायपरकार मॅक्लरेन सेना


पोर्तुगालचा सॉसर आयकॉन आणि युवेंटस क्लबचा स्टार फुटबॉलर क्रिस्तियानो रोनाल्डोने नुकत्याच खरेदी केलेल्या हायपरकार मॅक्लरेन सेनाचा व्हिडीओ पोस्ट केला असून त्याची ही नवी कार ६ कोटी ६० लाख रुपये किमतीची आहे. रोनाल्डो महागड्या कार्सचा शौकीन असून त्याच्या संग्रही अनेक महागड्या कार्सचा ताफा आहे. रोनाल्डोने त्याच्या इन्स्टाग्राम अकौंटवर तो हि कार चालवत सरावासाठी येत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. ही मॅक्लरेन सेना हायपरकार लिमिटेड एडिशन स्पोर्ट्स कार असून तिचे नामकरण ब्राझिलियन एफ वन रेसर आर्टन सेना याच्या नावावरून केले गेले आहे.


मॅक्लरेन सिरीज मधली ही एफ वन आणि पी वन नंतरची तिसरी कार असून तिला ४ लिटरचे व्ही ८ पेट्रोल इंजिन, ७ स्पीड ट्वीन कल्च ऑटो गिअरबॉक्स सह दिले गेले आहे. कूप स्टाईलच्या या कारचा सर्वाधिक वेग तशी ३४० किमी आहे आणि ० ते १०० चा वेग ती २.८ सेकंदात घेते. ही कार २०१७ मध्ये सादर केली गेली होती मात्र तिचे अधिकृत लाँचिंग २०१८ च्या जिनेव्हा मोटर शो मध्ये केले गेले होते. रोनाल्डोच्या संग्रही फेरारी, लोम्बार्गिनी, मर्सिडीज, ऑडी, रोल्स रॉइस, बीएमडब्ल्यू, अॅस्टन मार्टिन अश्या एकसो एक १०० हून अधिक कार्स आहेत. त्यात मॅक्लरेन सेनाची भर पडली आहे.


जगातील सर्वाधिक महागडी अशी जाहिरात आणि प्रसिद्धी झालेली बुगाटी ला वोल्तूर नोईरे म्हणजे ब्लॅक कार रोनाल्डोने घेतल्याची चर्चा काही दिवसापूर्वी जोरात होती. ही कार जिनेव्हा शो २०१९ मध्ये सादर करण्यात आली होती आणि तिची किंमत होती ११ दशलक्ष डॉलर्स म्हणजे १ कोटी १० लाख डॉलर्स. बुगाटीने खरेदीदाराचे नाव जाहीर न करता या कारसाठी ग्राहक मिळाल्याचे सांगितले होते. मात्र नंतर ही कार फर्डिनंड पीच याने घेतल्याचे उघड झाले. पीच हा पोर्शे या प्रसिद्ध कार कंपनीच्या संस्थापकाचा नातू असून तो बुतागीची पेरंट कंपनी व्होक्सवॅगन चा सीईओ होता.

Leave a Comment