ग्रामीण देवता अय्यनार आणि मातीचे घोडे


विविधतेने नटलेल्या भारतात अनेक धर्मीय लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत आणि प्रत्येक धर्माच्या विविध चालीरीती, रूढी, परंपरा येथे पाळल्या जातात. ग्रामीण भारतात त्यातही हिंदू बहुल असलेल्या भागात घोडे, हत्तीवर स्वार झालेल्या अनेक देवदेवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात त्या बहुतेक ग्रामदेवता असतात. केरळ आणि तामिळनाडू मध्ये गावाबाहेर अगदी उघड्यावर याच प्रकारे भगवान अय्यनार याच्या मूर्ती पाहायला मिळतात. या ग्रामदेवतेचा उत्सव सध्या सुरु असून साधारण वसंत ऋतू मध्ये तो साजरा केला जातो.


अय्यनार ही या भागातील सर्वात लोकप्रिय ग्रामदेवता मानली जाते. द.भारतातील प्रत्येक गावाचे रक्षण तो करतो अशी समजूत आहे. अय्यनारच्या मूर्तीसोबत घोडे आणि हत्तीच्या मूर्ती असतात आणि ग्रामीण जनता या देवाला मातीचे घोडे वाहून त्याचा आशीर्वाद घेते. या अय्यनारमूर्ती बरोबर पूर्णा आणि पुष्का या त्याच्या पत्नींच्या मुर्तीही पाहायला मिळतात. अय्यनार ही युद्धदेवता आहे त्यामुळे त्याच्या हातात चाबूक किंवा राजदंड असतो. त्याला न्यायाधीश या रूपातही पूजले जाते. त्याच्यासोबत रक्षक असतात आणि त्याला भल्याथोरल्या झोकदार मिशा असतात.


ग्रामीण भागात अय्यनार हा शंकर आणि मोहिनीचे रूप घेतलेल्या विष्णूचा पुत्र असल्याचे मानले जाते. त्याने परशुरामाकडून युध्द कौशल्य मिळविले असाही समज आहे. या संरक्षक देवतेमुळे नैसर्गिक संकटे, रोगराई, जंगली पशु, शत्रू यांच्या पासून गावाचे रक्षण होते अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे. अय्यनार अर्ध्या रात्री घोड्यावरून फिरतो आणि भूत प्रेते, वाईट आत्मे, दुष्ट लोक यांची शिकार करतो असा समज आहे. गावकरी त्याला मातीचे घोडे बनवून ते अर्पण करतात. अय्य म्हणजे मोठा भाऊ किंवा सन्माननीय व्यक्ती. त्याला आपल्या अडचणी सांगायलाही गावकरी येतात. त्यासाठी १२.५० पैसे आणि कागदावर आपली अडचण लिहून दिली जाते. पुजारी ती तक्रार वाचून दाखवितात आणि त्या तक्रारीचे निवारण होते असे सांगतात.

या देवतेची पूजा करण्यासाठी ब्राह्मण पुजारी नसतो तर बहुदा कुंभार पुजारी असतात. जो कुणी पूजा करेल त्याला अय्यनारची मूर्ती बनविता आली पाहिजे असा संकेत आहे. या देवाला मातीचे घोडे वाहिले जातात तसेच लोखंडी त्रिशूल वाहण्याची प्रथा आहे.

Leave a Comment