इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात सहारा समूहाची एन्ट्री


वित्तीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहारा इंडिया समूहाने सहारा इव्होल्स या ब्रांडनेम सह इलेक्ट्रिक वाहन उद्योगात प्रवेश केला असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. या कंपनीत इलेक्ट्रिक वाहनांची सर्वात मोठी श्रेणी सादर केली जाणार असून या पोर्टफोलियोमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर, मोटरसायकल, तीन चाकी वाहने आणि मालवाहतूक करणारी वाहने यांचा समावेश आहे. याचबरोबर सहारा इव्होल्स बॅटरी चार्जिंग कम स्वॅपिंग स्टेशनचे एक नेटवर्क सुध्दा लाँच करणार आहे. याची सुरवात लखनौपासुन केली गेली असून त्याची व्याप्ती टप्प्या टप्प्याने दोन आणि तीन श्रेणीतील शहरांपर्यंत वाढविली जाणार आहे.


सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांच्या म्हणण्यानुसार या अर्थवर्ष अखेर कंपनी आपली इकोसिस्टीम स्थापन करणार असून पुढच्या आर्थिक वर्षात संपूर्ण देशात उत्पादन आणि सेवा लाँच केली जाईल. सहारा इव्होल्सची वाहने चालविण्याचा खर्च प्रती किलोमीटर २० पैसे इतका कमी असेल असा दावा केला जात आहे. याचा अर्थ ही वाहने २० रुपयात १०० किमीचा प्रवास करू शकणार आहेत. सध्या पेट्रोल वाहन चालविण्यासाठी प्रती किलोमीटर २ रु. खर्च येतो.

संपूर्ण भारतात प्रथम पूर्ण इलेक्ट्रिक वाहनांची एक इकोसिस्टीम सादर केली जाणार आहे त्यामुळे देशाचा कच्चे तेल आयातीवर होत असलेला खर्च कमी होईल आणि भावी पिढीला त्याचा फायदा होईल, ही काळाची गरज आहे असे सुब्रतो रॉय यांचे म्हणणे आहे. जर्मन इजिनिअर्सनी या वाहनाचे डिझाईन आणि विकास केला असून सामान्य वाहनाच्या तुलनेत या इलेक्ट्रिक वाहनांचे तंत्रज्ञान, डिझाईन आणि पिकअप खूपच पुढच्या पातळीचे आहे. या वाहनांचा देखभाल खर्च कमी असून बॅटरी फास्ट चार्ज होणारी आहे. ही वाहने त्यांच्या श्रेणीनुसार एका चार्ज मध्ये ५५ ते ११० किमीचे अंतर कापू शकतील असे सांगितले जात आहे.

Leave a Comment