मीटू नंतर जपानी महिलांची # कुटू मोहीम सुरु


लैगिक शोषण विरोधात सुरु झालेल्या मी टू अभियानाच्या प्रचंड यशानंतर जपानी महिलांनी त्याच धर्तीवरची किटू मोहीम # कुटू नावाने सुरु केली असून अल्पावधीत ३० हजार महिलांनी ती शेअर केली आहे. जपान मध्ये महिलांना कार्यालयात कामावर जाताना उंच टाचेची पादत्राणे वापरणे बंधनकारक आहे. त्या विरोधात ही मोहीम छेडली गेली आहे. या संदर्भात १९ हजार महिलांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महिलांच्या ड्रेस कोड मध्येच हाय हिल्स समाविष्ट असून हे बंधन रद्द केले जावे आणि ज्या महिलांना हवे असेल त्यांना फ्लॅट जोडे घालून कार्यालयात येत यावे अशी त्यांची मागणी आहे.


या संदर्भात जपानची लोकप्रिय अभिनेत्री युमी इशिकावा हिने पुढाकार घेतला आहे. तिच्या म्हणण्यानुसार ज्या महिला फ्युनरल पार्लर मध्ये काम करत असतात त्यांच्यासाठी हाय हिल्सचा नियम केला गेला होता मात्र आजकाल सर्वच कार्यालयांनी हा नियम केला आहे. उंच टाचांचे जोडे तासानतास पायात घालण्याने पाय, पाठ, कंबर दुखण्याचा त्रास सहन करावा लागतो शिवाय त्यामुळे शरीराचे पोश्चर बदलते आणि पाठीच्या कण्यावर त्याचा भार पडतो. जपानी भाषेत कुत्सू या शब्दाचा अर्थ पादत्राण असा आहे. यातील पहिला शब्द कु आणि मी टू मोहिमेतील दुसरा शब्द टू यापासून नवीन कुटू शब्द तयार केला गेल्याचा खुलासा जपानी वृतपत्र क्योडो न्यूजने केला आहे.


कॅनडामध्ये याच प्रकारे महिलांना कार्यालयात येताना हाय हिल्स वापराचे बंधन होते ते २०१७ मध्ये उठविले गेले होते. उंच टाचामुळे पडणे, दुखापत होणे, पाय घसरणे याची शक्यता असते आणि त्यामुळे जखमी होण्याचा धोका जास्त असतो हे तेथे मान्य केले गेले होते. या नव्या जपानी अभियानावर जपानी नागरिकांनी मजेदार प्रतिक्रिया नोंदविल्या असून जपानी पुरुषांनी सरकारी कर्मचार्यांना कार्यालयात येताना क्लीन शेव करून येण्याचे जे बंधन आहे ते उठविले जावे अशी मागणी केली आहे.

Leave a Comment