प्रविण तरडेंच्या ‘सरसेनापती हंबीरराव’चे पहिले पोस्टर रिलीज


प्रविण तरडे यांच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. या चित्रपटानंतर आता दिग्दर्शक, अभिनेता प्रविण तरडे प्रेक्षकांच्या भेटीला कोणता चित्रपट आणणार हा प्रश्न अनेकांना पडला होता. पण शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यात निघालेल्या मिरवणुकीमध्ये आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा तरडे यांनी केली.

प्रविण यांनी त्यांच्या चित्रपटाचे एक पोस्टर नुकतेच सोशल मीडियाद्वारे रिलीज केले आहे. चित्रपटाचे नाव ‘सरसेनापती हंबीरराव’ असल्याचे या पोस्टरद्वारे स्पष्ट झाले आहे. कॅप्शनमध्ये त्यांनी ‘नवा चित्रपट, नवा थरार\ सरसेनापती हंबीरराव. लेखक दिग्दर्शक प्रविण तरडे आणि टीम’ असे लिहिले आहे. तसेच ‘तुटुन पडला जरी हात, नाही सोडली तलवारीची साथ’ असे पोस्टवर लिहिले आहे.

अवघ्या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराज यांचे सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांची ख्याती माहित आहे. प्रविण तरडे यांच्या ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटात त्यांचा हाच जीवनप्रवास दाखवण्यात येणार आहे. शिवनेरी फाउंडेशन या ऐतिहासिक चित्रपटाची निर्मिती करत असून संदिप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सुर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण विठ्ठल तरडे यांचेच असणार आहे.

स्वराज्याला आपल्या चाणाक्ष बुद्धीमत्तेच्या जोरावर हंबीरराव मोहिते यांनी श्रीमंती मिळवून देण्यास मदत केली. या चित्रपटात त्यांच्याच नजरेतून मराठा साम्राज्य दिसणार आहे. हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची या चित्रपटामध्ये वर्णी लागली आहे. पण हंबीरराव मोहिते यांची भूमिका या चित्रपटात कोण साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. या चित्रपटाचे काम सध्या सुरु असून तो प्रेक्षकांच्या जानेवारी २०२० मध्ये भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

Leave a Comment