खोड काढण्यासाठी खायला दिले टुथपेस्टवाले बिस्कीट आणि मग…


आपल्या पैकी बहुतेक जणांना एखाद्याची खोड काढण्यात खुप मजा येते. कारण खोड काढणाऱ्या व्यक्तीचा असा समज असतो की खोड काढल्याने काहीजण ओरडतील आणि त्यानंतर विसरुन देखील जातील. पण एका तरुणाला हीच खोड किती महागात पडली ते न विचारलेलेच बरे… पण तुम्ही कोणाची खोड काढत असाल तर ही बातमी नक्की तुमच्यासाठी आहे. खोड काढण्यासाठी त्या पठ्ठ्याने ओरिओ बिस्कीटातील क्रिम काढून त्याजागी चक्क टूथपेस्ट लावले होते आणि त्याने ती बिस्कीटे एका गरीबाला खाण्यास दिली. पण त्याला हीच खोड काढल्यामुळे १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

स्पेनमधील ही घटना असून येथे Kanghua Ren नावाचा एक यूट्यूबर आहे. एका ५२ वर्षीय रस्त्यावर राहणाऱ्या व्यक्तीला त्याने टूथपेस्ट लावलेले बिस्कीट दिले. ते त्याने खाल्ले सुद्धा पण त्याला नंतर उलटी झाली. ती व्यक्ती लगेच पोलिसांकडे गेली आणि त्याने तरूणाची तक्रार केली. पोलिसांना त्याने सांगितले की, रस्त्यावर राहत असताना आजपर्यंत कुणीही त्याच्यासोबत अशी गंमत केली नाही.

यासंदर्भातील वृत्त ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार रेन याला एका व्यक्तीचा सन्मान दुखावल्याप्रकरणी १५ महिन्यांची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्पॅनिश कायद्यानुसार, पहिल्यांदा अहिंसक अपराध करणाऱ्या आरोपीला कमीत कमी दोन वर्षांची शिक्षा दिली जाते. त्यानुसारच रेन याला १५ महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आपला बचाव करताना रेन याने सांगितले की, केवळ एक गंमत म्हणून हा व्हिडीओ केला होता. नक्कीच ही गंमत बेकार होती. मी लोकांना हसवण्याचे काम करतो. लोकांना असे व्हिडीओज आवडतात. रेनला २० हजार यूरो दंडही भरावा लागला.

Leave a Comment