पुण्यातही पोहचले शेणाने कार सारवण्याचे क्रेझ


सध्याच्या घडीला देशातील उष्णतेचा पारा फारच चढलेला दिसत आहे. देशातील काही राज्यात तर उष्णतेमुळे तापमान 50च्या पार गेले आहे. त्यातच देशातील काही नागरिक उन्हाच्या कडाक्यापासून बचाव करण्यासाठी विविध कुल्पत्या शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर गुजरातमधील एका महिलेने शेणाने कार सारवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. सेजल शहा या महिलेने आपल्या Toyota Corolla Altis या लाखो रुपयांच्या लक्झरी कारला शेणाने सारवले होते. त्यानंतर मात्र स्वतःची कार शेणाने सारवण्याची जणू क्रेझ आल्याचे दिसत आहे. कारण, पुण्यातील एका डॉक्टरने आता आपल्या महिंद्रा एक्सयुव्ही500 या गाडीला शेणाने सारवले आहे.

मुंबईच्या टाटा कॅंसर हॉस्पिटलमध्ये पुण्यातील नवनाथ दुधाळ हे वरिष्ठ डॉक्टर आहेत. आपल्या महिंद्रा एक्सयुव्ही500 ला त्यांनी शेणाने सारवले आहे. पुण्यातील नागरीक उन्हामुळे हैराण झाले आहेत, पण इतक्या उन्हाचा शेणाने सारवल्यानेही गाडीवर काहीच परिणाम पडत नाही. आता मी कारमधील एसीचा वापरही थांबवला आहे. ही पर्यावरणासाठी देखील चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया दुधाळ यांनी याबाबत बोलताना दिली.

गाडीच्या काचा आणि हेडलाईट व्यतिरिक्त सर्वत्र दुधाळ यांनी शेण फासले आहे. गाडीवर तीन थरांमध्ये शेण सारवण्यात आले असून हे आवरण एक महिन्यापर्यंत टिकू शकते. यामुळे बाहेरील तापमानाच्या तुलनेत कारमधील तापमान 5 ते 7 अंश कमी असते. शेण एका महिन्यानंतर पाणी आणि सुती कापडाने सहज साफ करता येते. त्याचबरोबर शेणामुळे गाडीवर कोणत्याही प्रकारचे डाग पडत नाही किंवा गाडीच्या रंगावरही काहीच परिणाम होत नाही. काही वेळासाठी कारमध्ये थोडाफार वास नक्कीच येत असतो, पण थोड्याच वेळात वास निघून जातो, असे दुधाळ म्हणाले. गोमुत्र आणि गायीच्या शेणामुळे कर्करोग झालेल्यांना होणाऱ्या फायद्याबाबत बरच वाचन आणि अभ्यास केला आहे, त्यामुळेच गाडी शेणाने सारवण्याचा विचार डोक्यात आल्याचे दुधाळ यांनी सांगितले.

Leave a Comment