पुढच्या महिन्यात बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन


मुंबई : येत्या जुलै महिन्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन होणार आहे. टेंडर प्रक्रिया लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लांबली होती. एमएमआरडीए आता ती महिनाभरातच पुर्ण करणार. यानंतर जुलै महिन्यात भूमीपूजनानंतर प्रत्यक्ष स्मारकाच्या कामाला सुरवात होणार आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी आणि एमएमआरडीएच्या अतिरिक्त आयुक्त सोनिया सेठी उपस्थित होत्या. गेली पाच वर्षे विविध कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन अखेरीस आता शिवसेनाप्रमुखांचे राष्ट्रीय स्मारक आकारास येणार आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हे अंडरग्राऊंड स्मारक मुंबईतील महापौर बंगल्यात बांधले जाणार आहे. अंडरग्राऊंड स्मारकाच्या प्रस्तावाला हेरिटेज समितीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. दादरमध्ये असलेल्या महापौर बंगल्याच्या आवारात अनेक जुनी झाडे आहेत. ही झाडं न तोडता बंगल्याखाली स्मारक उभारण्यात येणार आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगल्याची 2300 स्क्वेअर फुटाची जागा कमी पडली असती. बाळासाहेबांचे अंडरग्राऊंड स्मारक नऊ हजार स्क्वेअर फूट जागेत तयार होणार आहे. बंगल्याच्या मागच्या आणि पुढच्या जागेचाही स्मारकासाठी वापर केला जाणार आहे. बंगल्याच्या आतील खोल्या आणि दालनांमध्ये बाळासाहेबांचे फोटो, स्मरणचित्रे, व्यंगचित्रे लावली जातील. स्मारकात तयार करण्यात येणारी गॅलरी, हॉल अशा वास्तू अंडरग्राउंड असतील. सध्याची महापौर बंगल्याची वास्तू ही हेरिटेज असल्यामुळे तिच्या मूळ रचनेत कोणतेही बदल केले जाणार नाहीत.

Leave a Comment