चक्क मराठी गाणे गाणार अकॉन?


आतापर्यंत अनेक सुपरहिट गाणी हॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक अकॉनने गायली आहेत. अभिनेता शाहरुख खानच्या रा-वन या छम्मक छल्लो या गाण्यामुळे भारतीय लोकांना अकॉन या गायकाची ओळख झाली आहे. अकॉनच्या भारतीय चाहत्यांमध्ये या गाण्यानंतर तिप्पटीने वाढ झाली. सध्या भारतात अकॉनचे लाखो चाहते आहेत. अकॉन या चाहत्यांसाठी लवकरच मराठीतून गाणे गाणार असल्याची शक्यता आहे. यासंदर्भातील वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच भारतीय चाहत्यांसाठी अकॉन एक गाणे गाणार आहे. हे गाणे मराठीतून असणार आहे. अकॉनचे हे नवे गाणे चाहत्यांच्या भेटीला महाराष्ट्रातील एडी मीडिया पुणे या डिजीटल मार्केटिंग कंपनीद्वारे येणार आहे.

यासंदर्भात एडी मीडिया या कंपनीचे मालक अक्षय गिरमे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महिन्यांपूर्वी मी अकॉनचे छम्मक छल्लो हे गाणे ऐकले. मी हे गाणं ऐकल्यानंतर त्या गाण्याच्या प्रेमात पडलो. अकॉनचे हिंदी गाणे जर इतके सुपरहिट ठरु शकते, तर मग त्याचे मराठी गाणेही तितकच हिट होईल, अशी माझी खात्री आहे.

खरतंर याबाबत काही सांगणे खूप लवकर होईल, पण हो हे खरं आहे की अकॉन लवकरच एक मराठी गाणे गाणार आहे. अकॉनसोबत सध्या आमची चर्चा सुरु आहे. या चर्चेनंतरच अधिकृतपणे अकॉन मराठी गाणे गाणार का याबाबतची घोषणा केली जाईल. हे गाणे 2019 या वर्षाच्या अखेरपर्यंत रिलीज होणार आहे. अकॉनच्या या नव्या गाण्याचे शूटिंग पुणे किंवा मुंबईत करण्यात येणार आहे. छम्मक छल्लो या गाण्याप्रमाणे हे गाणे अकॉनच्या चाहत्यांना नक्की आवडले, अशी माहिती एडी मीडिया या कंपनीचे मालक अक्षय गिरमे यांनी दिली.

Leave a Comment