या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना वेटर्स भरविणार जेवण !


आपल्यापैकी प्रत्येकाच्या, विशेषतः महिलांच्या आयुष्यामध्ये अशी वेळ अनेकदा येते, जेव्हा घरी स्वयंपाक करणे अगदी जीवावर येते. इतर कामांमुळे झालेली दमणूक, किंवा कधी तेच ते पदार्थ करण्याचा कंटाळा आला की घराबाहेर पडून आपल्या आवडत्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन भोजन करण्याचा घाट आपण अनेकदा घालत असतो. स्वयंपाकाचा कंटाळा येणे स्वाभाविक असले, तरी कधी तरी कामांचा व्याप आणि दगदग इतकी जास्त वाढते, की जेवण पुढ्यात असले, तरी घास उचलून तोंडी घेण्याचे त्राणही अंगी उरलेले नसते. अशा वेळी जेवण कोणीतरी भरविले तर किती चांगले होईल असाही विचार आपल्या मनामध्ये डोकावून जातो. कल्पना तशी मजेशीर असली, तरी आता हीच कल्पना प्रत्यक्षात उतरविणारे एक रेस्टॉरंट लंडनमध्ये सुरु होत आहे.

लंडन येथील ‘मेरीलीबोन’ या ठिकाणी सुरु होत असलेल्या ‘हँड्स ऑफ’ रेस्टॉरंटमध्ये भोजनासाठी येणाऱ्या ग्राहकांना स्वतःच्या हातांनी भोजन न घेण्याची मुभा आहे. इथे ग्राहकांना भोजन भरविण्यासाठी वेटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांना केवळ भोजन भरविण्यासाठीच नाही, तर पाणी किंवा इतर पेये पाजण्यासाठी देखील वेटर्सची नेमणूक करण्यात आली आहे. रेस्टॉरंट मेम्बरशिप डिस्काउंट क्लब ‘टेस्टकार्ड’ आणि ‘फेंग शुई’ नामक सुशी रेस्टॉरंट यांच्या द्वारे संयुक्त रित्या ‘हँड्स ऑफ’ रेस्टॉरंट येत्या अकरा जून रोजी ग्राहकांसाठी खुले होत आहे. अकरा जून पासून केवळ पुढील चार दिवसांसाठी हे रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले राहणार आहे.

या रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांसाठी अनेक चायनीज खाद्यपदार्थांच्या सोबत काही खास जपानी पदार्थही उपलब्ध करविले जाणार आहेत. या रेस्टॉरंटमध्ये भोजन घेण्यासाठी ग्राहकांनी आधीपासूनच नावनोंदणी करायची असून, प्रत्येकी पंचवीस पौंड रक्कम ग्राहकांसाठी आकारण्यात येणार आहे. हे रेस्टॉरंट चार दिवस ( अकरा जून ते चौदा जून )सुरु राहणार असून, याद्वारे झालेली मिळकत समाजकल्याणकारी उपक्रमांसाठी खर्च करण्यात येणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *