बबिता फोगाट, विवेक सुहाग होणार आयुष्याचे जोडीदार


दंगल चित्रपटामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या फोगाट पहिलवान कुटुंबातील बबिता फोगाटने तिच्या जीवनसाथीची निवड केली आहे. भारत केसरी विवेक सुहाग आणि बबिता फोगाट नोव्हेंबरमध्ये विवाहबद्ध होत असून त्यांचा हा प्रेमविवाह आहे. अर्थात याला दोन्ही कुटुंबांकडून संमती मिळाली आहे. गेली पाच वर्षे ते दोघे एकमेकांना ओळखत असून त्यांच्या मैत्रीचे रुपांतर पुढे प्रेमात झाले होते आणि आता त्याची परिणीती विवाहात होत आहे.

बबिता हरियानातील बलाली गावाची आहे तर विवेकचे मूळ गाव राजस्थान सीमेला लागून असलेले भवानी चरखी दादरी हे आहे. या भागात आजही खाप पंचायतीचे प्राबल्य असून येथे प्रेमविवाह करण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र आता या भिंती तुटू लागल्याचे चित्र आहे. बबिताचे वडील महावीर यांनीच प्रथम त्यांच्या मुलीना मुलांबरोबर कुस्ती खेळायला लावून हे बंधन तोडले होते. मुलीमुलांना त्यांच्या पसंतीचा जोडीदार निवडण्याचे मिळत असलेले स्वातंत्र्य या समाजात नवा अध्याय सुरु करणारे ठरले आहे असे मत व्यक्त केले जात आहे.

बबिताने २०१०च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रजत, २०१४ च्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड, २०१८च्या गोल्ड कोस्ट स्पर्धेत रजत पदकाची कमाई केली असून अनेक अन्य पदके तिने मिळविली आहेत. विवेक भारत केसरी असून सध्या रेल्वेमध्ये नोकरी करतो. त्यांच्या विवाहाची बातमी खुद्द बबिताने तिच्या फेसबुक आणि ट्विटर अकौंटवर दिली आहे. या विषयी बोलतना महावीर फोगाट म्हणाले, मुलांच्या आनंदात आम्ही खुश आहोत. बबिता जेथे राहील तेथे सुखी आणि खुश राहावी हीच आमची इच्छा आहे. त्यांचा साखरपुडा केला आहे आणि नोव्हेंबर मध्ये ते विवाह करतील.

Leave a Comment