मोदी, शहा, दोभाल त्रिकुटामुळे हबकला दाऊद


लोकसभा निवडणुका पार पडून मोदी सरकार दोन सत्तेवर आल्याचा सर्वाधिक हबका भारताचा मोस्टवॉंटेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याला बसला असल्याचे गुप्तचर संस्थातील सूत्रांकडून सांगितले जात आहे. त्यातही पंतप्रधान मोदी यांनी गृहखात्याचा कारभार अमित शहा यांच्याकडे दिल्याने दाऊद अधिक सतर्क झाला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून पुन्हा अजित दोभाल याच्यावर जबाबदारी दिली गेली आहे. दोभाल पाकिस्तानची नस न नस जाणतात. यामुळे दाऊदचा चेला आणि निकटवर्ती छोटा शकील याने डी गँग मधील देशविदेशात काम करत असलेल्या साथीदारांची एक गुप्त बैठक अज्ञात स्थळी घेतली असून इंटरनेटबेस्ड कॉन्फरन्स कॉल वरून बहुतेक साथीदारांशी संपर्क साधल्याचे झी न्यूज वेबसाईटने म्हटले आहे.

मोदी सरकार पुन्हा सत्तेवर येताच दाउदने पाकिस्तानी आयएसआय मधील अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्याच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केल्याचेही सांगितले जात आहे. नवे गृहमंत्री अमित शहा अतिशय कडक प्रशासक म्हणून ओळखले जातात. गुजराथ सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहखाते होते तेव्हा त्यांनी माफिया आणि अंडरवर्ल्डवर कडक कारवाई केली होती. आता त्यांच्याकडे देशाचे गृहमंत्रीपद आले आहे आणि त्यामुळे दाऊद आणि डी कंपनीच्या बंद केल्या गेलेल्या जुन्या फायली पुन्हा ओपन केल्या जातील आणि त्यावर त्वरित निर्णय आणि कारवाई होईल अशी भीती दाऊदला वाटते आहे. मोदी सरकार प्रथम सत्तेवर आले तेव्हाच दाऊदच्या भारतातील साथीदारांची धरपकड, संपत्ती जप्त करणे, दाऊदचे प्रत्यार्पण करण्याबाबत हालचाली सुरु झाल्या होत्या.


दाऊदचे आजही देशविदेशात मोठे नेटवर्क असून खंडण्या उकळणे, अमली पदार्थ व्यापार, अवैध शस्त्रे, धमक्या देणे, बनावट चलन, सट्टा यासारखे उद्योग सुरु आहेत. छोटा शकीलने अज्ञात स्थळी घेतलेल्या बैठकीत सध्या तरी कोणतीही जोखीम घेऊ नये असे आदेश डी गँगला दिले आहेत. भारतात त्याचा व्यवसाय सांभाळणाऱ्या साथीदारांना गुप्तचर यंत्रणा, पोलीस याच्यापासून सावध राहण्याच्या, तसेच धोका अधिक असेल तर भारत सोडून थायलंड, नेपाळ, दुबई, बांगलादेश येथे काही दिवस काढण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत आणि परदेशातील या साथीदारांचा सर्व खर्च डी कंपनी करेल असेही सांगितले गेल्याचे समजते. एकंदरीत मोदी, शहा आणि दोभाल त्रिकुट एकत्र आल्याने दाऊदचा धीर सुटला आहे असे दिसून आले आहे.

Leave a Comment