नितांतसुंदर सिल्व्हासा


पर्यटनासाठी कुठे जावे याचा उहापोह बहुतेक सर्व इत्छुक करत असतात आणि त्यातही नेहमीच्या फेमस पर्यटनस्थळांना अधिक पसंती देण्याकडे बहुतेकांचा कल दिसून येतो. पण आपल्या देशात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत ज्याचा फारसा विचार केला जात नाही किंवा त्यांच्याबद्दल माहिती नसते. महाराष्ट्र गुजरात सीमेवरचे असेच एक नितांतसुंदर पर्यटन स्थळ म्हणजे सिल्व्हासा. दिव दमण या केंद्रशासित प्रदेशातील हे गाव अनेक अर्थाने वेगळे आहे आणि त्यामुळे ते अधिक आकर्षक आहे.


येथे सुंदर समुद्रकिनारे आहेत तश्याच सह्याद्री पर्वतरांगाची सोबतही आहे. हे औद्योगिक शहर आहे आणि मॉडर्न सिटी पण आहे. येथे निसर्ग आणि आधुनिकता यांचा अतिशय सुंदर संगम पाहायला मिळतो. येथे आधुनिक शहरी लोक आहेत तसेच वारली आदिवासी मोठ्या संखेने आहेत. सिल्व्हासा ही जुन्या काळातली पोर्तुगीज वसाहत. सिल्व्हासाचा अर्थच मुळी कमालीचे चुंबकीय आकर्षण असलेले जंगल असा आहे.


येथे निसर्गप्रेमी, साहसप्रेमी, इतिहासप्रेमी प्रत्येक पर्यटकासाठी काही ना काही आहे आणि सर्वांचेच येथे स्वागत आहे. वारली आदिवासींची बोली, त्यांची खास जीवनशैली, नृत्य गायन यांना त्यांच्या जीवनात असलेले विशेष महत्व यांची ओळख करून घेण्याची अनोखी संधी आहे.


येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. वारली समाज यात अग्रेसर आहे. पर्वतरंगांच्या चोहोबाजूने पसरलेली हिरवीगार शेते डोळ्यांना शांतवा देतात आणि वारली समाजात विविध प्रसंगाने केली जाणारी नृत्ये, त्यांची विशिष्ठ चित्रकला मनाला उल्हासित करतात. वारली लोकांची बहुतेक नृत्ये सामुहिक असतात. विवाह प्रसंगी तूर थाळी, नवीन धान्य कापणीच्या वेळी ढोल नृत्य आणि मुखवटे घालून केले जाणारे नृत्य तनमनाला एक प्रकारची लय देतात.


या शहरात पोर्तुगीज काळातील अनेक स्मारके आजही आहेत. द चर्च ऑफ आवर लेडी, नावाचे चर्च वास्तूकलेचा सुंदर नमुना आहे. यात आतल्या भागात लाकडावर सुंदर चित्रकारी केली गेली आहे. १८९७ साली हे चर्च बांधले गेले आहे. या शिवाय पोर्तुगीज कॉलनी आहे. नक्षत्र गार्डन, दुधानी, धबधबे, वन्यप्राणी जीवन, सुंदर समुद्र किनारे, ट्रेकिंगच्या वाटा, निसर्गभ्रमण, कयाकिंग, बोटिंगची मौज अश्या अनेक प्रकारे येथला वेळ आपण कारणी लावू शकतो. आराम करायची इच्छा असेल तर अनेक सुंदर सुंदर रिसोर्ट तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. नोव्हेंबर ते मार्च हा काल येथे जाण्यासाठी सर्वोत्तम आहे.

Leave a Comment