ठाकरे-फडणवीसांची जनतेसमोर 'महायुती' विधानसभा एकत्रित लढण्याची ग्वाही - Majha Paper

ठाकरे-फडणवीसांची जनतेसमोर ‘महायुती’ विधानसभा एकत्रित लढण्याची ग्वाही


मुंबई- लोकसभेत भाजप प्रणित एनडीएने बहुमताने सत्ता काबिज केल्यानंतर आता महायुती विधानसभाही एकत्रित लढणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेसमोर दिली आहे. या दोन्ही नेत्यांनी आगामी विधानसभेतही महायुती अभेद्य राहील असे ईशान्य मुंबईतून महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या विजया निमित्त आयोजित केलेल्या सिद्धी संकल्प सभेत स्पष्ट केले.

माजी खासदार किरीट सोमैय्या यांना ईशान्य मुंबई मधून उमेदवारी देऊ नये, अशी मागणी शिवसेनेने केल्यानंतर काहीसा तणाव शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे कोटक यांच्या प्रचाराला येणेही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टाळले होते. पण ठाकरे यांनी विजय सिद्धी संकल्प मेळाव्याला हजेरी लावली. तसेच आगामी विधानसभेत पुन्हा नेत्रदीपक यश मिळवू, असेही सांगितले.

भाजप आणि शिवसेनेत मतभेद होते, राजकारणात ते होत असते, पण देश वाचवण्यासाठी आम्ही समजूतदार पणा दाखवला. त्यामुळे विरोधकांची हवाच गेली. देश जपण्यासाठी युती केली आहे. विकासाचे शिवधनुष्य नरेंद्र मोदी यांनी पेलले आहे, त्यालाच आमचा पाठिंबा आहे, असेही यावेळी ठाकरे यांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी आपल्या भाषणात किरीट सोमैय्या यांचा उल्लेख टाळला.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, विजयाचे सर्व कार्यकर्ते शिल्पकार असून मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्याची ही सभा म्हणजे संधी आहे. निवडणुकीच्या पंडीतांनाही या विजयाने खोटे पाडले निवडणुकी पूर्वी आपण नवे भारताचे चौकीदार होतो. आता आपण नवे भारताचे सैनिक आहोत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. विधानसभेतही हीच महायुती एकत्रित निवडणुका लढवून यश मिळवेल, असेही त्यांनी सांगितले.

आशिष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांच्या आधी भाषण झाले, आपल्या भाषणात त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करत आपण शेलार मामा असल्याचे सांगत परतीचे दोर आपणच कापले असल्याचे मिश्किल शब्दात सांगितले. नवनिर्वाचित खासदार मनोज कोटक यांनी याप्रसंगी सांगितले की, जनतेने नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवत संसदेत काम करण्याची संधी दिली आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्य सिद्धी संकल्प करू.

Leave a Comment