रणजितसिंहच्या डीएनए वक्तव्याला रामराजे नाईकांचे प्रत्युत्तर


सातारा – विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना प्रत्युत्तर देताना सांगितले की फलटणचे घराणे जात-पात न मानणारे असून आमचे आजोबा श्रीमंत मालोजीराजे हे प्रगल्भ विचाराचे होते. कुठे घेऊन आमच्या आई-वडिलांच्या लग्नाचा पुरावा येऊ, आपले हजार रुपये तयार ठेवा. आपले आव्हान खासदारसाहेब स्वीकारले असल्याचे प्रतिआव्हान दिले आहे. कोळकी (ता. फलटण) येथील कार्यकर्ता मेळाव्यात रामराजे बोलत होते.

रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नवनिर्वाचित खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी घणाघाती आरोप केला होता. ते म्हणाले होते की, ओरिजनल नाईक-निंबाळकर मी असून माझा डीएनए तपासाल तर हा रणजित ९६ पिढ्यांपासून नाईक निंबाळकर असल्याचे पाहायला मिळेल. पण तुमच्या आईचे आणि वडिलांचे लग्न झाले असेल तर त्या लग्नाचा दाखला मला दाखवा आणि मला जो कोणी दाखला देईल त्याला मी १ हजाराचे बक्षीस देईन. कारण, रामराजे हे बिन लग्नाची अवलाद आहेत आणि हा इतिहास आहे.

रामराजे नाईक निंबाळकर वरील आरोपांना उत्तर देताना म्हणाले की, आमच्यावर अपघाताने निवडून आलेल्या खासदारांनी खालच्या पातळीवर येऊन, बोलून आपली संस्कृती फलटणकरांना दाखवून दिली आहे. आपल्याला भविष्यात याची किंमत जरूर मोजावी लागेल. आपल्या कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. आमची त्याची पूर्ण जबाबदारी आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी सज्ज व्हा. डीएनएची तर भाषाच खासदारांनी करू नये, ती त्यांच्या अंगलट येईल, असेही रामराजे म्हणाले.

रामराजे यावेळी बोलताना पुढे म्हणाले, गावच्या हिताचे सार्वजनिक कामे आजपर्यंत राजकीय कारकिर्दीमध्ये कोणीच घेऊन आले नाही. ही माझी खंत आहे. कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत किती कामे केली याचा विचार करण्याची गरज आहे. अहंकार सोडून आपल्याला राजकारण करावे लागले. आपल्याला गावा गावात असणारे दोन गट एकत्र करूनच काम करावे लागेल. तुम्हाला ती जबाबदारी घ्यावी लागेल. आमची शिव्या देण्याची संस्कृती नाही.

Leave a Comment