जुने ते सोने, या कार्सनी केले सिद्ध


जगरहाटी मध्ये कोणत्या गोष्टी आपण खरेदी केलेल्या किमतीपेक्षा भविष्यात जादा किमतीला विकल्या जातील याचे काही आडाखे असतात. त्यानुसार मातीमोल भावात घेतलेल्या जमिनी सोन्याच्या किमतीने विकल्या जातात हे ठळक उदाहरण देता येईल. सर्वसाधारण पणे इलेक्ट्रोनिक वस्तू अथवा वाहने घेतल्या किमतीपेक्षा कमी किंवा कदाचित मातीमोल भावाने विकाव्या लागतात हा अनुभव अनेक घेतात. कार्सच्या बाबतीत हाच अनुभव येतो. म्हणजे कार जितकी जुनी तितकी तिची किंमत कमी असे गणित असते. काही कार्स मात्र या नियमाला अपवाद ठरतात आणि जुने ते सोने ही म्हण त्याच्याबाबतीत लागू पडते. जगात अश्या प्रकारे सर्वाधिक किमतीला विकल्या गेलेल्या १० जुन्या कार्सची माहिती खास आमच्या वाचकांसाठी


या यादीत सर्वप्रथम आहे ती फेरारीची १९६२ मध्ये बनविलेली २५० जीटीओ कार. रेसिंग जगतात इतिहास बनविलेली ही कार ऑगस्ट २०१८ मध्ये सोथबे या लिलाव कंपनीने तब्बल ४,८४,०५,००० डॉलर्स म्हणजे ३३५. ३५ कोटी रुपयांना विकली. या यादीत दोन नंबरवर फेरारीची याच वर्षात बनविलेली आणखी एक कार बोनहम लिलाव कंपनीने ऑगस्ट २०१८ मध्येच ३,८१,१५,००० डॉलर्स म्हणजे २६४.०६ कोटींना विकली. कंपनीने या मॉडेलच्या ३९ कार्स बनविल्या होत्या.


फेरारीचीच हाय प्रोफाईल रेस मध्ये सामील असलेली १९५७ ची ३३५ एस ही कार फेब्रुवारी २०१६ मध्ये ३.५७ कोटी डॉलर्स म्हंजे २४७.४१ कोटींना विकली गेली होती. फेरारीच्या २७५ जीटीबी ४ * एस स्पायडर मॉडेलच्या फक्त १० कार बनविल्या गेल्या होत्या त्यातील एक ऑगस्ट २०१३ मध्ये २.७५ कोटी डॉलर्स म्हणजे १९०.५२ कोटींना विकली गेली होती. या कार्स १९६७ साली बनविल्या गेल्या होत्या. याच कंपनीची २७५ जीटीबी/ सी स्पेशल १९६४ मध्ये बनविली गेलेली कार ऑगस्ट २०१४ मध्ये सोथबेने २.६४ कोटी डॉलर्स म्हणजे १८३ कोटींना विकली होती.


मर्सिडीज बेन्झची डब्ल्यू १९६ कार सोथबेने जुलै २०१३ मध्ये २.९६ कोटी डॉलर्स म्हणजे २०५.०७ कोटींना विकली. १९५४ साली कंपनीने अश्या १४ कार्स बनविल्या होत्या त्यातील १० अजून अस्तित्वात आहेत. पैकी ६ कंपनीकडे, तीन संग्रहालयात आहेत. लिलावात विकली गेलेली ही कार खासगी मालकीची एकमेव कार होती.


अॅस्टन मार्टिनची डीबीआर १ कारची फक्त ५ युनिट बनविली गेली होती त्यातली पहिली सोथबेने ऑगस्ट २०१७ मध्ये २,२५,५०,००० डॉलर्स म्हणजे १५६ कोटींना लिलावात विकली होती.


ड्युसेनबर्ग एसएसजे ही अमेरिकन स्टार गॅरी कुपर याने १९३५ साली सर्वप्रथम खरेदी केलेली कार त्याकाळी पॉवरफुल म्हणजे ४०० एचपी ताकदीच्या इंजिनची कार होती. ती ऑगस्ट २०१८ मध्ये गुडिंग अँड कंपनीने २.२० कोटी डॉलर्स म्हणजे १५२.४२ कोटींना विकली.


१९५५ साली बनविली गेलेली जग्वार डी टाईप कारने १९५६ सालची ले मॅन्स २४ अवर्स ही रेस जिंकली होती. हि रेस जिंकणारी सी अथवा डी टाईपची ही एकमेव कार होती आणि ती अजूनही मूळ स्थितीत आहे. या कारचा लिलाव सोथबेने ऑगस्ट २०११ मध्ये केला तेव्हा तिला २,१७,८०,००० डॉलर्स म्हणजे १५०.९० कोटी रुपये मिळाले होते.

Leave a Comment