घरचे जेवण पुरविणार स्विगीचे नवे अॅप


फूड प्लॅटफॉर्मवर अतिशय उत्तम कामगिरी बजावत असलेल्या स्विगीने सेवा विस्तार करताना एक नवे अॅप स्विगी डेली नावाने सुरु केले आहे. यामुळे बाहेरचे खाऊन कंटाळलेल्या अथवा घराच्या जेवणाची खास आवड असलेल्या भुकेल्या लोकांची चांगलीच सोय होणार आहे. या अॅपच्या मदतीने ग्राहक घरगुती पदार्थ, टिफिन किंवा खाद्यपदार्थ बनविणारे संघटीत वेंडर्स यांच्याकडून आवडीचे खाद्यपदार्थ मागवून आपली भूक शमवू शकणार आहेत. सोमवारी हे अॅप गुरुग्राम मध्ये लाँच झाले असून लवकरच ते मुंबई, बंगलोर येथेही सुरु होणार आहे.

यामध्ये ग्राहक त्याला जेवण अथवा खाद्यपदार्थ कोणत्या वेळी हवेत याची वेळ नोंदवून ठेवू शकणार आहेत. ग्राहक दररोज, आठवडा अथवा महिना पद्धतीने त्यांची ऑर्डर नोंदवू शकतील आणि त्यांना हवे तेव्हा त्यांचा प्लॅन बदलून घेऊ शकतील. काही दिवस खाडा करू शकतील किंवा ही सेवा पूर्ण बंद करू शकतील. या सेवांमध्ये ५० रुपयांपासून ते १५० रुपये या रेंज मध्ये खाद्यपदार्थ मिळणार आहेत. त्यात शाकाहारी, मांसाहारी पदार्थ असतील आणि गुजराती, पंजाबी, राजस्थानी, तमिळ पद्धतीचे भोजन मिळू शकणार आहे. पुढच्या काही महिन्यात या मेन्यू मध्ये स्नॅक्स, पेयपदार्थ, कापलेली फळे समाविष्ट केली जाणार आहेत.

स्विगीचे कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेती म्हणाले, कंपनी ही सेवा घेणाऱ्या ग्राहकांना पहिल्या महिन्यात २० टक्के डिस्काउंट देणार आहे. या सेवेमुळे ग्राहक रोज स्वस्त, घरगुती खाद्यपदार्थ मागवू शकणार आहेत आणि घरच्या जेवणाची त्यांची गरज पूर्ण करू शकणार आहेत.

Leave a Comment