कुल माहीचा लकवर आहे विश्वास


अमुक एक गोष्ट केली कि हमखास यश मिळते अशी कुणाची समजूत असेल तर आपण त्याला अंधश्रद्धा म्हणतो. म्हणजे कुणी गळ्यात ताईत घालतो, कुणी बोटात अंगठ्या घालतो तर कुणी ठराविक रंग महत्वाच्या कामासाठी जाताना वापरतो. कुणी लकी नंबर नुसार कामे करतो. म्हणजे आपले पंतप्रधान मोदी महत्वाचे निर्णय घेताना ८ हा नंबर पाहून घेतात असे सांगितले जाते. अर्थात ही यादी येथेच संपत नाही. टीम इंडियाचा माजी कप्तान कुल महेंद्रसिंग धोनी आणि अनेक खेळाडू लकवर विश्वास ठेवतात. खुद्द धोनीने अशी कबुली एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे. तो म्हणतो खेळाशी जोडलेल्या अंधविश्वासावर त्याचा विश्वास आहे.

मैदानावर उतरताना शांत, संयमित दिसणारा धोनी काही लकी गोष्टी पार पाडून मगच मैदानावर येतो. कप्तानपदावर असताना धोनीने प्रत्येक आयसीसी खिताब ट्रॉफी देशासाठी जिंकली आहे आणि टीमला टेस्ट सामन्यात नंबर वन टीम असा लौकिक मिळवून दिला आहे. ज्याला अंधविश्वास म्हणता येईल अश्या बाबत बोलताना धोनी त्याची एक आठवण सांगतो. धोनी बरेच वेळा नाणेफेक हरत होता. म्हणजे ३०-३२ सामन्यात तो २९ वेळा नाणेफेक हरला. तेव्हा गेल्यावेळी आपण मागितलेले दान यावेळी मागायचे नाही असे तो ठरवत असे पण ऐनवेळी गेल्या वेळी आपण कुठले दान मागितले ते विसरत असे. तो म्हणतो निवडीसाठी दोन पर्याय असतील तर तो गोंधळतो पण अनेक पर्याय असतील तर चांगली कामगिरी बजावू शकतो.

त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत त्यात बदल करायचा असे धोनीने ठरविले. म्हणजे त्याच्यासाठी लकी नंबर असलेल्या सात हा आकडा. ठराविक ग्लोव्ज, पॅड वापरणे वगैरे. धोनी पुस्ती जोडतो कि बहुतेक सर्व खेळाडू आणि क्रिकेट मधील १०० टक्के खेळाडू असे शकून मानतात. धोनीने तो नक्की कशावर विश्वास ठेवतो हे उघड केले नाही मात्र त्याच्यासाठी लकी असलेल्या ७ नंबरची जर्सी, ७ नंबर हा दुबईत तयार केलेल्या परफ्युमचा वापर त्यासाठी पुरेसे बोलके आहेत. तसेच सामना जिंकल्यावर स्टंप उचलून आणून ती संग्रही ठेवणे ही त्याची कृती अनेकांनी पहिली असेल. धोनी सांगतो अंकशास्त्रानुसार ७ नंबर न्युट्रल आहे. म्हणजे त्याचे पॉझीटिव्ह तसेच निगेटिव्ह इफेक्ट नाहीत.


मास्टरब्लास्टर सचिन सामन्यासाठी मैदानवर येताना प्रथम डाव्या पायाचे पॅड बांधत असे कारण ते त्याच्यासाठी लकी होते तसेच द वॉल राहुल द्रविड उजव्या पायाचे पॅड याच कारणाने प्रथम बांधत असे. अनिल कुंबळेने एका इनिंग मध्ये १० बळी घेतले तेव्हा तो प्रत्येक बळी मिळाला कि त्याची टोपी आणि स्वेटर सचिनच्याच हातात देत होता हे अनेकांनी पहिले असेल.


विरू आका म्हणजे आपला वीरेंद्र सेहवाग प्रथम ४४ नंबरची जर्सी वापरत असे पण त्याला म्हणावे तसे यश मिळत नव्हते. तेव्हा एका अंकज्योतिषाचा सल्ला मानून त्याने नंबर नसलेली जर्सी वापरायला सुरवात केली आणि इतिहास रचला. माजी कप्तान सौरव गांगुली खिशात त्याच्या गुरूचा फोटो ठेवणे आणि उजव्या मनगटात पूजेचा लाल दोरा बांधणे आवर्जून करत असे.


आताचा टीम इंडिया कप्तान विराट त्याचे ग्लोव्ज्स अतिशय लकी मानत असे आणि प्रत्येक सामन्याच्यावेळी तेच ग्लोव्ज्स वापरत असे. मग कधीतरी आपला खेळ, त्यातील आपले कौशल्य आपल्या यशात महत्वाचे ठरते आहे हेही त्याला समजले असे त्याचे निकटवर्ती सांगतात. आता विराट त्या ठराविक ग्लोव्ज्ससाठी फारसा अडून बसत नाही म्हणतात.

Leave a Comment