जगामध्ये असे ही विश्वविक्रम !


या जगामध्ये असे अनेक लोक आहेत ज्यांना काहीतरी चाकोरीच्या बाहेरचे, इतरांच्या पेक्षा काही तरी हटके करून दाखविण्याची तीव्र इच्छा असते. आपल्या याच इच्छेपायी या मंडळींनी असे काही जगावेगळे कारनामे केले, की ते कारनामे जाणून घेऊन जगाने आश्चर्याने तोंडात बोटे घातली. हे कारनामे करताना या मंडळींनी प्रसंगी आपले जीवही धोक्यात घातले, आणि आगळेच जागतिक विक्रम घडले. एखादी व्यक्ती धारदार तलवार गिळू शकते हे तुम्हाला कोणी सांगितले, तर तुम्हाला ते खरे वाटेल का? पण असे घडले आहे. अमेरिकेच्या नताशा वेरुस्का या तरुणीच्या नावे तब्बल ५८ सेंटीमीटर लांबीची तलवार गिळल्याचा विक्रम नोंदला आहे. २००९ साली नताशाने हा जागतिक विक्रम केला होता. तिने ही धारदार तलवार आपल्या घशामध्ये घालून काही सेकंदांनी बाहेर काढून जागतिक विक्रम केला होता.

ब्रिटनचा निवासी सायमन एल्मोर याच्या नावे एके हटके विश्वविक्रम नोंदलेला आहे. सायमनने एकाच वेळी चारशे स्ट्रॉ स्वतःच्या तोंडामध्ये धरण्याचा विक्रम केला होता. २००९ साली जर्मनी येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये सायमनने हा विक्रम नोंदविला. हे चारशे स्ट्रॉ सायमनने एकाच वेळी दहा सेकंद इतक्या अवधीसाठी आपल्या तोंडामध्ये धरले होते. ऑस्ट्रिया देशाच्या जोसेफ टॉटलिंग नामक एका व्यक्तीने स्वतःच्या जीवावर खेळून हटके विश्वविक्रम नोंदविला. जोसेफने स्वतःला पेटवून घेऊन घोड्याच्या लगामाला स्वतःला बांधून घेतले आणि तशा अवस्थेत घोड्याच्या मागे सुमारे अर्धा किलोमीटर खेचले जाण्याचा विक्रम जोसेफच्या नावे नोंदलेला आहे. २०१५ साली जोसेफने हा विक्रम केला होता.

आपल्याला कोणी तोंडाने हवा भरून फुगे फुगवायला सांगितले तर थोडेसेच फुगे फुगविल्यानंतरच आपली दमछाक होते. मात्र अमेरिकेतील कोलराडो येथे राहणाऱ्या हंटर इवान्स या व्यक्तीने एका क्षणाचीही विश्रांती न घेता एका मागोमाग एक असे तब्बल ९१० फुगे तोंडाने हवा भरत फुगविले. अजिबात विश्रांती न घेता लागोपाठ इतके फुगे फुगविण्याचा विश्वविक्रम हंटरच्या नावे नोंदलेला आहे. युक्रेनची निवासी असलेली ओल्गा लिशचक हिच्या नावे एक अजब विश्वविक्रम नोंदलेला आहे. २०१४ साली ओल्गाने केलेल्या विश्वविक्रमामध्ये तिने १४.६५ सेकंदांच्या अवधीत तीन मोठमोठी कलिंगडे आपल्या मांड्यांमध्ये दाबून फोडली होती. इटलीतील मिलॅन शहरामध्ये ओल्गाने हा विश्वविक्रम केला. अमेरिकेतील आयाना विलियम्स या महिलेच्या हातांच्या नखांची लांबी १०.९ इंच असून, लागतील सर्वात लांब नखे असल्याचा विक्रम आयानाच्या नावे नोंदलेला आहे. तर अमेरिकेतीलच टेक्सास मध्ये राहणाऱ्या लीन्सी लिंडबर्गच्या नावे, एका मिनिटामध्ये सर्वाधिक टेलिफोन डायरेक्टरी फाडण्याचा विक्रम नोंदलेला आहे. हा विक्रम लीन्सीच्या नावे २०१४ साली नोंदलेला असून, एका मिनिटामध्ये प्रत्येकी एक हजार पानांच्या पाच टेलिफोन डायरेक्टरी फाडण्याचा विक्रम लीन्सीने केला होता.

Leave a Comment