राम मंदिरासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करा – सुब्रमण्यम स्वामी


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राम मंदिरासाठी अयोध्येतील जमीन अधिग्रहीत करण्याची मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. त्यांनी ही मागणी मोदींना एक पत्र लिहून केली. त्याचसोबतच त्यांनी रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याची विनंतीही केली आहे.

उच्च न्यायालयाच्या परवानगीची राम मंदिराची जमीन अधिग्रहीत करण्यासाठी आवश्यकता नाही. कारण माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी १९९३ साली ही जमीन आधीच अधिग्रहीत केली असल्याचे स्वामी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयात अयोध्या जन्मभूमीचा वाद प्रलंबित आहे. जानेवारी महिन्यात मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करून वादग्रस्त स्थळाजवळील ६७ एकर अतिरिक्त जमीन मूळ मालक आणि राम जन्मभूमी न्यास यांना परत करण्याची मागणी केली होती. राम जन्मभूमी न्यास या समितीची स्थापना राम मंदिर उभारणीसाठी करण्यात आली होती.

आपल्या पत्रात सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे की, न्यायालयात सरकारने दाखल केलेल्या याचिकेतील मागणी चुकीची होती. जमीन अधिग्रहीत करण्यासाठी त्यांना कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. कारण रामजन्मभूमी त्यांच्याच ताब्यात आहे. सरकारला जमीन अधिग्रहित करण्यासाठी कोणत्याही अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची गरज नसल्याचे ते म्हणाले.

Leave a Comment