जेटच्या 2000 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार स्पाईसजेट


मुंबई : स्पाईसजेट एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेजच्या दोन हजार कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याची घोषणा स्पाईसजेट कंपनीचे चेअरमन अजय सिंह यांनी केली. आर्थिक परिस्थितीमुळे सध्या जेट एअरवेज कंपनी बंद पडली आहे. यामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर संकट आले आहे. स्पाईसजेट कंपनीने हा निर्णय या कर्मचाऱ्यांना आधार देण्यासाठी घेतला आहे.

जेट एअरवेजच्या 22 विमानांनाही स्पाईसजेटने आपल्या ताफ्यात सामील करुन घेतले आहे. आर्थिक संकटात अडकलेली जेट एअरवेज कंपनी आता पूर्णपणे बंद पडली आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांचे काही महिन्यांचे पगारही दिलेले नाहीत. जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या कंपनीत घेणार आहोत. त्यांच्यात क्षमता आहे आणि ते मेहनतीही आहेत. यापुढेही आम्ही जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना नोकरी देण्याच्या प्रयत्नात असू, असे अजय सिंह म्हणाले.

जेट एअरवेजच्या 1100 कर्मचाऱ्यांना आम्ही आमच्या कंपनीत घेतले आहे. हा आकडा 2 हजार पर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. यामध्ये पायलट, चालकांचा समावेश असेल. तसेच विमानतळावरील सुरक्षा रक्षकांचाही यामध्ये समावेश असेल, असेही अजय सिंह यांनी स्पष्ट केले.

स्पाईसजेटच्या कर्मचाऱ्यांची संख्या सध्या 14 हजार आहे आणि त्यांच्या ताफ्यात 100 विमाने आहेत. 100 विमान असलेल्या कंपनीच्या यादीत एअर इंडिया, जेट एअरवेज (आता बंद पडलेली कंपनी) आणि इंडिगोनंतर चौथी कंपनी स्पाईसजेट आहे. स्पाईसजेटजवळ बोइंग 737, बॉम्बार्डिअर क्यू 400 आणि बी 737 फ्रायटर विमाने आहेत. स्पाईसजेट दिवसाला 575 विमानांचे उड्डाण करते. यामध्ये 9 आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानांचाही समावेश आहे.

Leave a Comment