कथा चोरल्या प्रकरणी ‘बाला’ चित्रपटाच्या विरोधात तक्रार दाखल


आपल्या प्रत्येक चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. काही दिवसांपूर्वीच त्यान आपल्या आगामी बाला चित्रपटाची माहिती सोश मीडियाच्या माध्यमातून शेअर केली होती. पण त्याचा हा चित्रपट चित्रिकरणापूर्वीच वादात अडकला आहे. या चित्रपटाविरोधात कमलकांत चंद्रा यांनी कथा चोरीचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

कमलकांत चंद्रा यांनी मार्च महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयात आयुष्मान खुराना, दिग्दर्शक अमर कौशिक आणि चित्रपट निर्माते दिनेश विजान यांच्या विरोधात चित्रपटाची कथा चोरी केल्याचा आरोप लावत तक्रार दाखल केली होती. कमलकांत यांनी आता पुन्हा एकदा न्यायालयाच्या निर्णयाआधी चित्रपटाचे शूटिंग सुरू केल्याबाबत आयुष्मान आणि चित्रपट निर्मात्यांवर कलम ४२० (फसवणूक) आणि कलम ४०६ (विश्वासघात) अंतर्गत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

६ मे रोजी चित्रपटाचे शूटिंग सुरु झाल्याचे ट्विट आयुष्मानने केले होते. पण शूटिंग न्यायालयाच्या निर्णयाआधी सुरू करणे चुकीचे आहे. मग, १५ दिवसातच त्यांनी शूटिंगला सुरुवात कशी केली?, असे चंद्रकांत यांनी म्हटले आहे. आयुष्मान आणि त्याच्या टीमने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. आमची स्क्रिप्ट मूळ, खरी आहे आणि आम्ही ती न्यायालयात सादर करु, असे त्यांनी म्हटल्यामुळे ‘बाला’ चित्रपटाचे भविष्य काय असेल, हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबुन आहे. तोपर्यंत प्रेक्षकांना या चित्रपटाची वाट पाहावी लागेल.

Leave a Comment