हेमकुंड साहिब यात्रा सुरु


हिमालयाच्या कुशीत, बर्फाळ शिखरात असलेल्या शीख समाजाच्या पवित्र हेमकुंड साहिब जत्रेची सुरवात शनिवारी झाली असून पहिल्या जथ्यात आठ हजार भाविक हेमकुंड साहिबकडे रवाना झाले आहेत. हिमालयातील सुंदर रमणीय ठिकाणी असलेले हे मंदिर एका विशाल सरोवराच्या काठी बांधले गेले आहे.


परंपरेप्रमाणे हिवाळ्यात चार महिने बर्फ पडत असल्याने हा मार्ग बंद केला जातो तो मे महिन्याच्या अखेरी पुन्हा सुरु होतो. यावेळीही परंपरेनुसार बद्रीनाथ राष्ट्रीय राज्य मार्गावर असलेल्या गोविंदघाट पासून २१ किमीवर असलेल्या हेमकुंड साहिब यात्रेची सुरवात झाली. समुद्रसपाटीपासून १५ हजार फुट उंचीवर असलेल्या या ठिकाणी बराचसा रस्ता पायी तुडवावा लागतो.


गुरुवाणीमध्ये वर्णन केल्यानुसार गुरु गोविंदसिंग हे लक्ष्मणाचा अवतार आहेत. त्यांनी शेष नाग आणि दृष्टद्युम्न यांच्या स्वरूपातही घोर तपस्या करून या ठिकाणी करून विष्णू सेवा केली होती. या ठिकाणी येणारे शीख भाविक प्रथम सरोवरात स्नान करून लक्ष्मण मंदिरात पूजा करतात. येथे गुरुग्रंथसाहिबचा प्रकाशोत्सव व दर्शन करण्याची प्रथा आहे. या वेळी गुरुग्रंथ साहिब सत्खंड मधून हेमकुंड दरबारात आणले जाते.


यंदा ही यात्रा १ जून ते १५ आक्टोबर या काळात होणार आहे. या यात्रेत शिख समुदायातील लहानथोर भाविक मोठ्या श्रद्धेने सामील होतात आणि अतिशय खडतर असा हा मार्ग तुडवून हेमकुंड साहिब दर्शन करतात.

Leave a Comment