विराट फिट, द. आफ्रिकेविरुद्ध लढणार


येत्या ५ जून रोजी वर्ल्ड कपच्या टीम इंडिया विरुद्ध द. आफ्रिका सामन्यात टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली खेळणार असल्याची बातमी टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी ठरली आहे. विराटच्या उजव्या अंगठ्याला सराव करत असताना दुखापत झाली होती आणि त्यामुळे विराट खेळणार कि नाही याबाबत संभ्रम होता. मात्र विराट फिट असल्याचे त्याच्या प्रशिक्षकांनी जाहीर केले आहे.

क्रिकेटचा महाकुंभ विश्वचषक सामन्यांची धूम सुरु झाली असून सराव फेरीचे सामने सुरु झाले असतानाच टीम इंडिया अडचणीत आली होती. टीम इंडियाचा कप्तान विराट कोहली शनिवारी साउथनटम्पच्या बाजेस बाउल स्टेडीयममध्ये सराव करत असताना जखमी झाला होता. त्याचा उजव्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली असून त्याने त्वरित फ़िजिओथेरपिस्ट पॅट्रिक फरहार्ट यांच्याकडे धाव घेतली आणि त्यानंतर तो बर्फ भरलेल्या ग्लास मध्ये बोट बुडवून ड्रेसिंग रूम कडे जाताना दिसला होता. त्याच्या जखमेविषयी बीसीसीआयने कोणताही खुलासा केलेला नव्हता मात्र रविवारी संपूर्ण टीम ला विश्रांती देण्यात आली असे समजते.

विराट टीम इंडियाचा कप्तान आहे आणि त्याच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यावेळी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडिया उतरली आहे. विराट नुसता कप्तान नाही तर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीने आणि स्वतःच्या हिमतीवर तो टीमला विजय मिळवून देऊ शकेल असा खेळाडू आहे. मात्र सराव सामन्यातच तो जखमी झाल्याने त्याची बॅट तळपणार का हा प्रश्न निर्माण झाला होता. विराटची जखम किती गंभीर आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र टीम इंडियाचा ऑलराउंडर विजय शंकर याचे कोपर दुखावलेले आहे आणि केदार जाधव अजून पुरेसा फिट नाही यामुळे टीम इंडिया सुरवातीलाच अडचणीत आली आहे. विराट तीन नंबरवरचा दमदार फलंदाज आहे आणि टीम इंडियातील ४ नंबर फलंदाज विश्वासार्ह नाही यामुळे विराट अनफिट असणे टीम इंडिया साठी धोक्याचे ठरू शकेल असे सांगितले जात होते.

Leave a Comment