इम्रानखानसाठी ईदची भेट म्हणून अजगराच्या कातडीचे जोडे


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना त्याच्या एका चाहत्याने ईदची खास भेटवस्तू देण्याची तयारी केली आहे. पेशावर मध्ये नामांकित असलेले चांभार किंवा पादत्राणे बनविणारे नूरउद्दीन चाचा त्याकामी व्यस्त असून ते इम्रानखान साठी खास जोडे तयार करत आहेत. हे जोडे अजगराच्या कातडीपासून बनविले जात आहेत. इमरानच्या नोमान नावाच्या एका चाहत्याने यासाठी खास अमेरिकेतून अजगराची कातडी पाठविली असून त्यातून जोडे तयार करण्याची ऑर्डर नूरउद्दीन चाचा यांना दिली आहे. मुस्लिमांचा पवित्र सण ईद ६ जूनला साजरा होत आहे त्यापूर्वी ही भेट इम्रानखान यांना दिली जाणार आहे असे समजते.


प्रथमदर्शनी हे जोडे पारंपारिक पेशावरी जोड्याप्रमाणे दिसत असले तरी पायात घातले की त्याची खासियत कळणार आहे असे सांगितले जाते. या पादत्राणांची खासियत अशी कि ऐन उन्हात ते पायात असतील तर उन्ह्याचा त्रास होत नाही आणि कितीही काम केले तरी शरीराला थकवा येत नाही. एका जोड्यासाठी किमान चार फुट लांबीच्या सापाचे कातडे लागते. मात्र इम्रानसाठी बनविले जात असलेले जोडे अजगराच्या कातडीचे असतील. इम्रानला हे भेट दिले गेले की त्याचे ब्रांड नेम ठेवले जाणार आहे.


या जोड्यांची किंमत ४० हजार पाकिस्तानी रुपये असून हे जोडे पूर्णपणे हाताने बनविले जात आहेत. जगभरात सापाच्या कातडीपासून बनविलेल्या अनेक वस्तू लोक मोठ्या शौकाने वापरतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात अजगराच्या कातडीपासून बनविलेल्या वस्तू हजारो डॉलर्स किमतीला विकल्या जातात. पाकिस्तानांत अजगर जवळजवळ नामशेष झाले असून काश्मीरच्या भांबर जिल्हात थोडे अजगर सापडतात. अजगराची शिकार अथवा त्याच्या कातडीचा व्यापार करण्यावर बंदी असून बेकायदा व्यापार आणि हवामान बदल यामुळे अजगर प्रजाती धोक्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment