फाळणीच्यावेळीच तुमचा हिस्सा दिला होता; ओवैसींना भाजपचे प्रत्युत्तर


मुंबई: भाजपकडून भारतामध्ये मुस्लीम म्हणजे भाडेकरू म्हणून राहत नाहीत. त्यांचा या देशात बरोबरीचा हिस्सा आहे, असे वक्तव्य करणारे एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांना चोख प्रत्यु्त्तर देण्यात आले आहे. भाजप नेते माधव भंडारी यांनी म्हटले की, सांभाळून असुदुद्दीन ओवेसी यांनी बोलायला पाहिजे. कधीही कोणीही त्यांना भाडेकरू म्हटले नाही. पण ते हिस्सेदारीची भाषा करत असतील तर एवढेच मी सांगू इच्छितो की, १९४७ मध्येच तुमचा हिस्सा देऊन टाकला. त्यामुळे आता हे प्रकरण संपले आहे, असे माधव भंडारी यांनी म्हटले.

शुक्रवारी दिल्लीतील एका सभेत असुदुद्दीन ओवैसी यांनी आम्ही कोणाचीही मनमानी सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. यावेळी त्यांनी म्हटले की, भाजपने लोकसभा निवडणुकीत ३०० जागा जिंकल्या म्हणजे आम्ही देशात मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. भारतीय राज्यघटनेचा हवाला देत मी पंतप्रधानांना इतकेच सांगू इच्छितो की, असुदुद्दीन ओवैसी हा मुस्लिमांच्या हक्कासाठी तुमच्याशी लढत राहील.

भारताच्या राज्यघटनेने आम्हाला आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. जर देशाचे पंतप्रधान मंदिरात जाऊ शकतात, तर आम्हीदेखील मशिदीत जाण्याचा हक्क आहे. आम्हाला हिंदुस्थानाला समृद्ध ठेवायचे आहे आणि आम्ही ते जरूर करु. मात्र, या देशात आमचा हिस्सा हा बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले होते.

Leave a Comment