हवाई वाहतूक मार्गावर लावलेले निर्बंध भारतीय हवाई दलाकडून शिथिल


नवी दिल्ली – सर्व हवाई मार्गावरील वाहतूक निर्बंध भारतीय हवाईदलाकडून शिथिल करण्यात आल्याची माहिती हवाई दलाकडून देण्यात आली आहे. दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. सर्व हवाई वाहतूक मार्गावर २७ फेब्रुवारी २०१९ ला लावलेले निर्बंध उठवण्यात आले असल्याची माहिती हवाई दलाकडून ट्विटरच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

सीआरपीएफचे ४० हून अधिक जवान १४ फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झाल्यानंतर अवघ्या १२ दिवसांमध्ये भारताने पाकिस्तानला जोरदार उत्तर दिले. भारतीय हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर पहाटे साडेतीनच्या सुमारास हल्ला केला. भारतीय हवाई दलाची १२ मिराज-२००० विमाने एकाच वेळी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रात शिरली आणि त्यांनी हा हल्ला केला. दोन्ही देशांकडून त्यानंतर हवाई वाहतुकीवर निर्बंध लावण्यात आले होते. भारतीय हवाई दलाकडून ते निर्बंध उठवण्यात आले आहे. पण १४ जुनपर्यंत हे निर्बंध पाकिस्तानने वाढवल्यामुळे भारतीय विमानांना पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जाता येणार नाही.

Leave a Comment