सुमित्रा महाजन यांच्या गळ्यात पडू शकते महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची माळ


मुंबई : भाजपप्रणित एनडीएने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादित केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 30 मे रोजी पंतप्रधानपदाची, तर त्यांच्या 57 सहकाऱ्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. विविध राज्यांमधील राज्यपालही नव्या सरकारकडून बदलण्याची किंवा नवे राज्यपाल नियुक्त करण्याची शक्यता आहे. यातच भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुमित्रा महाजन यांच्या नावाची महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी जोरदार चर्चा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये सुमित्रा महाजन यांना महाराष्ट्राचे राज्यपाल करावे, अशी चर्चा आहे. इंदूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार जाहीर करण्यास दिरंगाई केल्याने, सुमित्रा महाजन यांनी स्वत: नाराजी व्यक्त केली होती आणि निवडणूक लढवणार नसल्याचेही जाहीर केले होते.

आता महाराष्ट्राच्या राज्यपाल पदासाठी सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत आल्याने महाराष्ट्रातही आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मध्य प्रदेशात महाजन यांची राजकीय कारकीर्द गेली असली, तरी त्या मराठी आहेत. त्यांचे महाराष्ट्राशी जवळचे आणि रक्ताचे नाते असल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपालपदी मराठी व्यक्तीच विराजमान झाल्यास आपल्याला आनंद होईल, अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

Leave a Comment