राष्ट्रवादीने फेटाळली विलीनीकरणाची शक्यता


मुंबई : राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधील संभाव्य विलीनीकरणाची चर्चा शरद पवार आणि राहुल गांधी यांच्या भेटीनंतर सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीला राजकीयदृष्टय़ा विलीनीकरण अडचणीचे ठरणारे आहे. दुसरीकडे, विलीनीकरणाची शक्यताही राष्ट्रवादीने फेटाळून लावली आहे.

काँग्रेसला लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी तीन जागा कमी पडत असून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन झाल्यास काँग्रेस राष्ट्रवादीच्या पाच खासदारांच्या बळावर विरोधी पक्षनेतेपदावर दावा करू शकतो. या बदल्यात पवारांकडे राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेपद सोपविले जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अनेक वर्षे सुरू आहे. विलीनीकरणाचा सल्ला पवारांना दिग्विजय सिंह यांनीही दिला होता. तसे मतप्रदर्शन काँग्रेसच्या अन्य काही नेत्यांनीही केले होते.

काँग्रेसची लोकसभा निवडणुकीत पार वाताहात झाली. काँग्रेसचा लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पार धुव्वा उडाला. काँग्रेसचा जनाधार आटला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसशी जुळवून घेऊन राष्ट्रवादीचा काहीही फायदा होणार नाही. उलट नुकसानच होईल. त्यातच परस्परांबद्दल संशयाची भावना शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात आहे. उभयतांची नेहमी भेट होत असली तरी त्यांचे सूर फारसे जुळलेले नाहीत. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यास पुन्हा गांधी घराण्याचे वर्चस्व पवारांना मान्य करावे लागेल.

Leave a Comment