ग्वाल्हेरच्या राजमहालातील चंदेरी ट्रेन…


मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एके काळी मराठा सैन्याचे मानाचे सरदार असलेल्या शिंद्यांचे संस्थान म्हणून ओळखले जात असे. शिंदे, म्हणजे सिंदियांचे निवासस्थान असलेला ग्वाल्हेरचा भव्य, ‘जयविलास पॅलेस’ ह्या नावाने ओळखला जाणारा राजवाडा, आजही येथे दिमाखात उभा आहे. ह्या राजवाड्यातील काही भागामध्ये आता वस्तुसंग्रहालय आहे. येथील खासियत आहे इथल्या भोजन कक्षातील भव्य टेबलवर धावणारी चांदीची ट्रेन. राजनेत्या वसुंधरा राजे सिंदिया ह्यांचे आजोबा, महाराज माधो राजे सिंदिया ह्यांनी ही खास ट्रेन, १२० वर्षांपूर्वी तयार करविली होती. माधोराजे ग्वाल्हेर संस्थानाचे पाचवे महाराज असून, त्यांनी ग्वाल्हेर संस्थानावर १८८६ सालापासून १९२६ सालापर्यंत राज्य केले. त्यांना नवनवीन यंत्रे आणि तंत्रज्ञानामध्ये अतिशय मनापासून रुची होती. स्वतःच्या मालकीची चारचाकी गडी असणारे, आधुनिक शोधांबद्दल अतिशय कौतुक असणारे असे ते राज्यकर्ते होते.

माधोराज्यांच्या पुढाकाराने ग्वाल्हेर संस्थानातील अठ्ठावीस स्थानके ‘ग्वालियर लाईट’ रेल्वेमार्गे जोडली गेली. किंबहुना माधो राजे ह्यांना स्वतःला रेल्वेचे इंजिन चालविण्याचे कौशल्य अवगत होते, आणि आपल्या ह्या आवडीखातर ते रेल्वेचे इंजिन चालवीत देखील असत. त्यांना त्यांचे रेल्वे इंजिन आणि इतर नवनवीन यंत्रे इतकी प्रिय होती, की त्यांचे रेल्वे इंजिन निकामी झाल्यानंतर त्यांनी त्याच्या स्मरणार्थ, महालाच्या बागेमध्ये चक्क एक समाधी तयार करवून घेतली.

माधो राजे ह्यांनी तयार करवून घेतलेली, राजवाड्यातील डायनिंग टेबलवर धावणारी ट्रेन ही राजवाड्याची शान आहे. ‘बॅसेट लाओक’ ह्या खेळण्यातील ट्रेन्स तयार करणाऱ्या ब्रिटीश कंपनी कडून माधो राजे ह्यांनी ही खास चांदीची ट्रेन तयार करवून घेतली. ही ट्रेन जयविलास पॅलेसमधील भव्य भोजन कक्षातील टेबलवर ठेवण्यात आली असून, ह्या टेबलवर ट्रेन धावण्यासाठी मिनी ट्रॅक्स बसविण्यात आले आहेत. ह्या ट्रेन वरून सिगार्स, आणि मद्य, महाराजांच्या पाहुण्यांना सर्व्ह केले जात असे. ह्या चांदीच्या ट्रेनला एक इंजिन आणि सात कोच आहेत. या सातही कोचेसवर चांदी आणि काचेने तयार केलेले मद्याचे ‘डीकँटर्स’, म्हणजेच मद्य सर्व्ह करण्यासाठी बाटल्या बनविल्या गेल्या आहेत. ही ट्रेन चालविण्यासाठी एक खास पॅनल तयार केले गेले असून, त्याच्या मदतीने ट्रेन सुरु करता येते, किंवा पाहुणे आपल्या प्याल्यांमध्ये मद्य ओतून घेईपर्यंत थांबविता येते. आज ही हे ट्रेन ग्वाल्हेरच्या जयविलास पॅलेसमध्ये पाहता येते.

Leave a Comment