ही आहेत भारतातील आज ही न उमगलेली रहस्ये


भारतीय संस्कृती आणि प्रांत अनेक आश्चर्यांची आणि रहस्यांची गुंतागुंत असलेला असा आहे. इथे ज्याप्रमाणे अनेक आश्चर्यचकित करून टाकणाऱ्या वस्तूंचे निर्माण मानवाने केले आहे, त्याचप्रमाणे निसर्गाने केलेल्या आश्चर्यकारक, कधी भयचकित करणाऱ्या रचना इथे पाहायला मिळतात. ह्या गूढ रचनांनी जगभरातील पर्यटकांना, इतिहासकारांना आणि पुरातत्ववेत्त्यांना अचंभित करून टाकले आहे. आंध्र प्रदेशमध्ये असणारे वीरभद्र मंदीर विजयनगर साम्राज्यकालीन वास्तुकेलचा उत्कृष्ट नमुना आहे. ह्या मंदिरामध्ये असणारी विशालकाय नंदीची मूर्ती, भित्तीचित्रे, ह्याशिवाय आणखीन एक खासियत म्हणजे येथे अधांतरी उभे असलेले भव्य खांब. ह्या मंदिरामध्ये एकूण सत्तर खांब आहेत, पण ह्यातील एकही खांब जमिनीवर टेकलेला नाही. ह्या खांबांच्या खाली कोणतीही पातळ वस्तू सरकविता येऊ शकते.


रावणाने सीतेचे हरण करून तिला लंकेला नेल्यानंतर तिला परत आणण्याकरिता रामाने वानरसेनेच्या मदतीने सेतू तयार केल्याची कथा आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. हा सेतू भारतापासून श्रीलंकेपर्यंत तयार केला गेला होता. आज ही हा सेतू अस्तित्वात असून, ह्याला ‘अॅडम्स ब्रिज’ ह्या नावाने ओळखले जाते. हा सेतू मानवनिर्मित असल्याचे आता सिद्ध झाले असले, तरी ह्या सेतुवरील दगड पाण्यावर कसे तरंगू लागले, ह्याचे उत्तर अजूनही शास्त्रज्ञ शोधून काढू शकलेले नाहीत. महाबलीपुरम येथे असणारी प्रचंड शिला, ही श्रीकृष्णाचे लोण्याचे मडके असल्याची आख्यायिका आहे. ही विशालकाय शिला डोंगरावरील उताराच्या अगदी कडेवर असून, ती कधीही गडगडत खाली येईल असे पाहणाऱ्याला वाटते. मात्र ही शिला गेली अनेक शतके, होती त्या जागीच आहे. ह्या शिळेची उंची वीस फुट आहे. १९०८ साली ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हे शिला हलविण्याचा असफल प्रयत्न केला होता.
पूर्वोत्तर राज्य आसाम मधील जातीन्गा नामक गावामध्ये पावसाळा संपत आला, की धुके पडण्यास सुरुवात होते. ह्याच काळामध्ये इथे दर वर्षी एक अजब घटना घडते. येथे असणाऱ्या पक्षांमध्ये अचानक बदल दिसू लागतो. ह्या काळामध्ये पक्षी अतिशय अस्वस्थ झालेले दिसतात. हे पक्षी धुक्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात. काही पक्षी उडून जातातही, पण ज्यांचा प्रयत्न फसतो, ते पक्षी थकून जमिनीवर उतरतात. विशेष गोष्ट ही, की हे पक्षी पुन्हा उडण्याचा प्रयत्न करीत नाहीत. असे का घडते, ह्या रहस्याचा उलगडा आजतागायत झालेला नाही. केरळ येथील कोदिनी गावाचा इतिहास बहुचर्चित आहे. ह्या गावामध्ये फक्त जुळी मुलेच जन्माला येतात. ह्यामागे नेमके कारण वैज्ञानिक देखील सांगू शकत नाहीत. केवळ ह्या गावामध्ये आधीपासून राहणाऱ्या लोकांच्या घरीच नाही, तर बाहेरून ह्या गावामध्ये काही काळ राहण्यासाठी आलेल्या जोडप्यांना देखील जुळीच मुले झाल्याच्या अनेक घटना ह्या गावामध्ये घडल्या आहेत. गावाच्या पाण्यामध्ये असलेल्या काही रसायनांमुळे हे घडत असल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे.


आत्मा, भूत प्रेत अश्या गोष्टींवर सर्वांचा विश्वास असेलच असे नाही. पण ह्या बाबतीत राजस्थान येथील भानगढच्या किल्ल्याने अनेकांना हादरवून सोडले आहे, इतके मात्र नक्की. एके काळी वैभवाने संपन्न असलेला हा किल्ला आता निर्जन, उजाड आहे. सूर्यास्तनंतर येथे कोणी जाऊ नये अशी सूचना देणारा फलक येथे भारतीय पुरातत्व विभागातर्फे लावण्यात आला आहे. अतिशय सुंदर वास्तुकला असलेली मंदिरे, राजनिवास, उद्याने असलेल्या ह्या किल्ल्याविषयी अनेक रोचक कथा प्रसिध्द आहेत. येथे आलेल्या अनेकांनी आपले अनुभव देखील प्रसिद्ध केले आहेत. जरी इथे प्रत्यक्षात कोणाला काही दिसले नसले, तरी ह्या किल्ल्यातील एकंदर वातावरण मोठे गूढ, भीतीदायक असल्याबद्दल मात्र सर्वांचे एकमत आहे. पण ह्या किल्ल्याचे रहस्य आजही कोणाला उमगलेले नाही.

Leave a Comment