इतिहास जमा होणार मुंबई लोकलच्या महिला डब्यावरील महिला


मुंबईच्या लोकल ट्रेन्सची लाईफलाईन अशी ओळख आहे. पण दररोज या ट्रेनमध्ये काही ना काही नवीन बदल पाहायला मिळतात. आता मुंबई लोकल एका नवीन आणि अनपेक्षित बदलासह रेल्वेरुळांवरुन धावणार आहे. मुंबईच्या लोकल ट्रेन्समध्ये बदलत जाणाऱ्या काळाबरोबर स्वत:ला बदलणा-या सक्षम महिलांची झलक दाखविण्यासाठी महिला कोचच्या डोक्यावर पदर घेतलेल्या महिलेचा लोगो आता बदलून त्याजागी ब्लेझर घातलेली मॉडर्न महिला घेणार आहे. याबाबतचा विचार पश्चिम रेल्वे करत असून महिला कोचची माहिती प्रवाशांना व्हावी यासाठी निळ्या रंगाचा निर्देशक महिला कोचबाहेर लावण्याचाही विचार करत आहे.

यासंदर्भातील वृत्त मुंबई मिररने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, या लोगो बदलण्याबाबतच्या निर्णयावर पश्चिम रेल्वेचे व्यवस्थापक ए.के.गुप्ता यांनी शिक्कामोर्तब केला आहे. एवढच नव्हे तर महिलांना प्रेरणा देतील अशा खेळाडू सायना नेहवाल, मिथाली राज आणि अंतराळवीर कल्पना चावला यांसारख्या अनेक नामवंत अशा महिलांची माहिती देणारे फलक या डब्ब्यात लावण्यात येणार आहे.

ए.के. गुप्ता यांनी दोन महिन्यांपूर्वी लोकल रेल्वेची पाहणी केली असता, त्यांना ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काही महत्त्वाचे बदल ट्रेनमध्ये करणे गरजेचे आहे. त्यांना त्यावेळी साडीतील महिला ही आजच्या काळातील नोकरदार महिलेला साजेशी नसल्याचे वाटले. म्हणूनच हा लोगोच बदलण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाच्या टीमने यासाठी अनेक चित्रे तयार केली. ती करता करता शेवटी त्यांना असे एक चित्र मिळाले, या महिलेने ज्यात हाताची घडी घातली असून ब्लेझर घातले आहे. आजच्या काळातील महिलेचा आत्मविश्वास त्यात दिसून येतो. हे लोगो बदलण्याचे काम लवकरच पूर्ण करुन नवीन लोगो असलेल्या रेल्वे रुळांवरुन धावताना दिसतील, असे ए.के.गुप्ता यांनी सांगितले आहे.

Leave a Comment