शिवसेनेने आळवला भागवत राग


मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजेच भाजप प्रणित एनडीएला देशातील १७ व्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात कौल दिल्यानंतर झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी प्रभू रामचंद्राचे काम करायचे आहे आणि रामरायाचे काम होणारच असे वचन दिले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून या पार्श्वभूमीवर भाष्य करण्यात आले आहे.

रामाच्या विचाराचे सरकार देशाच्या सत्तेवर आले आहे. रामराज्य देशात निर्माण व्हावे यासाठी मोदी यांना कोट्यावधी जनतेने भरभरून मते दिली. सर्व प्रभू श्रीरामाचीच ही कृपा असून अयोध्येत राममंदिर व्हावे व त्यासाठी प्रयत्न करावेत हा काही अपराध नाही. देशाची राम ही ओळख आणि अस्मिता आहे. शेकडो कारसेवकांनी अयोध्येत राममंदिर निर्माण व्हावे यासाठी बलिदान दिले आहे. त्यांचे हौतात्म्य आणि रक्त वाया जाऊ देणार नाही, अशा विचाराचे सरकार लोकांनी निवडून दिल्यावर रामाचे काम होणारच, असा विश्वास या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये लोकसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयामुळे उत्साहाचे वातावरण आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी अशामध्ये राम मंदिराविषयी सूचक वक्तव्य केले आहे. उदयपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून चार दिवसीय प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.

मोहन भागवत यांनी रामाचे काम करायचे आहे आणि रामाचे काम होणारच. यावर लक्षही ठेवले जाईल, असे वक्तव्य केले आहे. राम मंदिराचा उल्लेख मोहन भागवत यांच्या वक्तव्यात नसला तरीही त्या दिशेनेच त्यांचा रोख असल्याचा कयास बांधला जात आहे. आरएसएसने लोकसभा निवडणुकीच्या आधीही राम मंदिरासंबंधी भाजप सरकारप्रती नाराजी व्यक्त केली होती. विश्व हिंदू परिषदेकडूनही राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा, अशी मागणी करण्यात आली होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाट पाहावी, असे स्पष्ट केले होते. याच मुद्याचा धागा पकडून सामनामधून शिवसेनेने रामाचे काम होणारच, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Leave a Comment