इगतपुरी न्यायालयाकडून राज ठाकरेंची 2008 च्या दंगल प्रकरणी निर्दोष मुक्तता


नाशिक – इगतपुरी येथील एका हॉटेलमध्ये मनसैनिकांकडून 2008 साली परप्रांतीया विरोधातील आंदोलनाच्या वेळेला दगडफेकीची घटना घडली होती. इगतपुरी पोलीस ठाण्यामध्ये या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. इगतपुरीच्या न्यायालयात याबाबत खटला सुरू होता. इगतपुरी न्यायालयाने आजच्या सुनावणी दरम्यान राज ठाकरेंची निर्दोष मुक्तता केली.

21 ऑक्टोबर 2008 ला मनसेने रेल्वे भरती परीक्षेदरम्यान परप्रांतीयाविरोधातील आंदोलन केले होते. मुंबई-आग्रा महामार्गावरील इगतपुरी जवळच्या साईप्लाझा हॉटेलवर मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती. राज ठाकरे आणि आणखी सहा मनसे कार्यकर्त्यांवर या प्रकरणी चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा खटला यानंतर इगतपुरी न्यायालयात सुरू होता. न्यायालयाने राज ठाकरे यांना अनेक वेळा हजर राहण्याचे आदेश देऊन सुद्धा राज ठाकरे न्यायालयात आले नव्हते. राज ठाकरे यांच्या विरोधात अखेर न्यायालयाने समन्स बजावल्याने राज ठाकरे 18 डिसेंबर 2018 ला इगतपुरी न्यायालयात हजर झाले होते. न्यायालयाने राज ठाकरे यांना त्यावेळी जामीन मंजूर केला होता. आजच्या सुनावणीत राज ठाकरे यांची इगतपुरी फौजदारी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.

Leave a Comment