शहाजहानच्या शाही खंजिरासह दुर्मिळ दागिन्यांचा लिलाव


मोगल काळातील व शाही भारतीय डागदागिने आणि दुर्मिळ कलाकुसरीच्या वस्तू यांचा लिलाव १४ ते १८ जून या काळात न्यूयॉर्क मध्ये जगप्रसिद ऑक्शन हाउस क्रीस्तीज तर्फे केला जाणार आहे. यात टिपू सुलतानाचा १८ व्या शतकातील सोन्याचा कलश, शहाजहान बादशहाचा रत्नजडीत खंजीर, हैद्राबाद निजामाचे मौल्यवान दागदागिने अश्या ४०० विविध वस्तू मांडल्या जाणार आहेत. महाराजा व मुगल वैभव या शिर्षकाखाली हा लिलाव होणार आहे.


या लिलावात मांडण्यात येणाऱ्या बहुतेक वस्तू ५०० वर्षांपेक्षा जुन्या आहेत. त्यातील शहाजहान बादशहाचा शाही खंजीर म्हणजे मुगल कलेचा बेजोड नमुना आहे. खंजिराच्या पात्याच्या मुठीला सोन्यात जडविलेले मौल्यवान खडे असून त्यावर शहजहानची एक पदवी कोरलेली आहे. या खंजिराला १० ते १७ कोटींची बोली लागेल असा अंदाज आहे. त्याचबरोबर पगडीवर घालायचे शिरपेच, आभूषणे, नेकलेस, ३३ गोलकोंडा हिरे, हिरे आणि माणके जडविलेली निजामाची तलवार या वस्तूही आहेत.


गोलकोंडा हिरे ८ ते १० कोटी, तलवारीसाठी ६ ते १० कोटींची बोली लागेल अशी अपेक्षा आहे. पतियाला महाराज भूपेंदरसिंग यांच्या मालकीचा असेलेला पतियाला माणिक चोकर हा अप्रतिम दागिनाही लिलावात असून १९३१ सालचा हा दागिना त्यावेळची प्रसिद्ध डिझायनर कंपनी कार्टियरने केले होते.


भारतात मुघल शासन काळ हा महत्वाचा काळ असून या काळात हिरे, पाचू, माणके, नीळ अश्या मौल्यवान रत्नांचा वापर करून अनेक सुंदर दागिने वस्तू घडविल्या गेल्या आहेत. या लिलावात आर्कोट द्वितीय याचा हिराही समाविष्ट असून हा हिरा आर्कोट नबाब मुहम्मद अली वालाजाह याने किंग जॉर्ज तिसरा याची पत्नी महाराणी शार्लोट हिला भेट दिला होता.

Leave a Comment