‘ही’ तरुणी देशातील सर्वात तरुण खासदार


भुवनेश्वर : सर्वात कमी वयाच्या महिला खासदाराला लोकसभा निवडणुकीत ओडिशाने संसदेत पाठवले आहे. देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार 25 वर्षीय ही तरुणी ठरली. या अनुसुचित जमातीतील तरुणीचे चंद्राणी मुर्मू असे नाव आहे. इंजिनिअरिंगचे शिक्षण तिने घेतले असून ती शिक्षणानंतर नोकरीच्या शोधात होती. पण 2019 च्या लोकसभा निवडणुकीने देशातील सर्वात कमी वयाची महिला खासदार तिला बनवले आहे.

चंद्राणी मुर्मू हिला बीजू जनता दलाने (BJD) क्योंझर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. अनुसूचित जमातींसाठी हा मतदारसंघ आरक्षित आहे. चंद्राणी यांनी निवडणुकीत मिळालेल्या या संधीचा फायदा घेत विजय तर मिळवलाच. तसेच देशातील लोकसभेत एक नवा इतिहास देखील घडवला. आत्तापर्यंतची सर्वात कमी वयाची खासदार होण्याचा मान आता चंद्राणी मुर्मू यांना मिळाला आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत चंद्राणी मुर्मू यांनी 67 हजार 822 मतांच्या फरकाने आपला विजय नोंदवला. भारतीय जनता पक्षाचे (BJP) दोनवेळा खासदार राहिलेल्या अनंत नायक यांचा चंद्राणी यांनी पराभव केला.

चंद्राणी मुर्मू याही काही महिन्यांपूर्वी अन्य तरुणींप्रमाणे एक सर्वसाधरण तरुणी होत्या. 2017 मध्ये भुवनेश्वरमधील एसओए विश्वविद्यालयातून बी. टेकचे शिक्षण घेतल्यानंतर त्या नोकरीचा शोध घेत होत्या. तसेच स्पर्धा परिक्षांचीही तयारी करत होत्या. चंद्राणी आपला प्रवास सांगताना म्हणाल्या, माझे इंजीनिअरिंगचे शिक्षण मी पूर्ण करुन नोकरी शोधत होते. मी राजकारणात येईल आणि खासदार होईल याचा मी कधीही विचार केला नव्हता.

खासदार बनण्याची संधी आपल्याला दिल्याबद्दल मुर्मू यांनी क्योंझरमधील लोकांचे आणि बीजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांचे आभार मानले आहे. चंद्राणी मुर्मू यांचे आजोबा हरिहर सोरेन 1980-1989 च्या काळात दोनवेळा खासदार राहिले आहेत. चंद्राणी यांचे कुटुंब कधीही राजकारणात सक्रिय नव्हते.

याआधी 16 व्या लोकसभेतील सर्वात कमी वयाचे खासदार इंडियन नॅशनल लोकदलाचे दुष्यंत चौटाला राहिले होते. 2014 मध्ये हिसार लोकसभा मतदारसंघातून ते खासदार म्हणून निवडून आले होते. त्यावेळी त्यांचे वय 26 वर्षे होते. ओडिशामध्ये एकूण 21 खासदार आहेत. यात 7 महिला खासदार आहेत. ही संख्या राज्याच्या एकूण खासदारांच्या 33 टक्के आहे. त्यामुळे कायदा नसतानाही महिलांना संसदेत 33 टक्के संधी देणारे ओडिशा पहिले राज्य ठरले आहे.

Leave a Comment