धर्मग्रंथाची पाने फाडून त्यात औषधे दिल्याप्रकरणी पाकिस्तानातील हिंदू डॉक्टर अटकेत


इस्लामाबाद – पाकिस्तानात हिंदू पशुवैद्यकीय डॉक्टरला ईश्वरनिंदा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्या डॉक्टर विरोधात एका स्थानिक धर्मगुरुने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता अटकेची कारवाई करण्यात आली. ही घटना पाकिस्तानातील सिंध प्रांतात घडली. या डॉक्टराचे नाव रमेश कुमार असे असून घटनेनंतर परिसरात तणाव आहे. हिंदूंच्या मालकीच्या दुकानाची संतप्त आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ केली असून रस्त्यांवर टायर जाळण्यात येत आहेत.

पोलीस ठाण्यात स्थानिक मशिदीचे धर्मगुरु मौलवी इशक नोहरी यांनी तक्रार केली होती. पवित्र धर्मग्रंथाची पाने फाडून डॉक्टर रमेश कुमार हे त्यामधून औषधे देत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. डॉक्टर रमेश कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान पोलिसांनी रमेश कुमार यांना परिसरात तणाव निर्माण झाल्यानंतर सुरक्षित ठिकाणी नेले असून घटनेची रितसर चौकशी करण्यात येत आहे. सिंध प्रांत आणि कराचीत हिंदूंची संख्या जास्त आहे. हिंदू अल्पसंख्यांक असून अनेकदा त्यांना टार्गेट केले जात आहे. वैयक्तिक शत्रुत्वातून अल्पसंख्यांकाविरोधात ईश्वरनिंदा केल्याच्या तक्रारी होत आहेत. यासंबंधी पाकिस्तान हिंदू परिषदेने तक्रारही केली होती.

Leave a Comment