स्वस्त दरात दुग्धजन्य पदार्थ विकणार पतंजली


नवी दिल्ली – दुधाचे दर प्रसिद्ध दूध वितरक अमूल आणि मदर डेरीने प्रतीलिटर दोन रुपयांनी वाढवल्याच्या काही दिवसातच बाजारात स्वस्त दुग्धजन्य पदार्थ योगगुरु रामदेव बाबा यांच्या पतंजली डेअरीने आणले आहेत. अमूल व मदर डेअरीप्रमाणेच प्रक्रिया केलेले दूध, याशिवाय दही, लस्सी आणि ताक पतंजलीने बाजारात आणले आहे. या नव्या प्रोडक्ट्सचे रामदेव बाबांनी नुकतेच अनावरण केले. इतर कंपन्यांशी हे सर्व प्रोडक्ट्स तुलना करता स्वस्त आणि गुणवत्तेतही दर्जेदार असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी केला आहे.

दिल्ली एनसीआऱ, राजस्थान, हरियाणा आणि महाराष्ट्रामधील प्रसिद्ध दूध वितरक कंपन्यांशी तुलना करता पतंजलीचे दर कमी असणार आहेत. अमूल आणि मदर डेअरीशी तुलना करता दूध पाच रुपये स्वस्त असेल असा दावा रामदेव बाबांनी केला आहे. याशिवाय पतंजलीने गाईच्या दुधाचे पनीरही बाजारात आणले आहे.

रामदेव बाबांनी पत्रकार परिषदेदरम्यान हरियाणा आणि राजस्थानमधून सर्व दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती दिली. पतंजली आगामी काळात हर्बल मिल्क आणि फुल क्रीम मिल्क लाँच करणार आहे. देशभरात सध्या प्रक्रिया केलेल्या दुधाची प्रचंड मागणी लक्षात घेता ४० रुपये प्रतीलिटर दराने पतंजली दूध विक्री करणार आहे. इतर कंपन्यांशी तुलना करता पतंजलीचे दूध चार रुपये स्वस्त असणार असल्याची माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

Leave a Comment