आजपर्यंत राजकारणातील अनेक धुरंधर नेत्यांना आव्हान देणार कोण आहे अभिजीत बुचकुले


ज्या मराठी रिअॅलिटी शो ची अवघा महाराष्ट्र वाट पाहत होता तो ‘मराठी बिग बॉस 2’ अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ह्या शो चा ग्रँड प्रिमिअर सोहळा रविवारी मोठ्या दिमाखात पार पडला. ह्या शो मध्ये अनेक अनपेक्षित तर काही अपेक्षित अशा स्पर्धकांची एन्ट्री झाली. ह्या शोमध्ये मराठी सिनेसृष्टीतील मालिका तसेच नाटकातील अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले असले तरीही कविमनाचा नेता अभिजीत बिचकुले याचे ह्या सर्वांमध्ये एक नाव चर्चेत राहिले. बिग बॉसच्या घरात त्याची एन्ट्री होताच सर्वच स्पर्धकांनी नाकच मुरडली असेच रविवारच्या भागात पाहायला मिळाले.

AB अर्थात अभिजीत बिचकुलेची साता-यामध्ये कवीमनाचे नेते म्हणून ओळख आहे. राजकारणातील अनेक धुरंधर नेत्यांना आजपर्यंत त्याने आव्हान दिले आहे. लोकशाहीतील अशी कोणतीच निवडणूक नाही, जिथे बिचकुलेंनी फॉर्म भरला नसेल. त्याने नगरसेवक पदापासून ते चक्क देशाच्या राष्ट्रपतीपदासाठी सुद्धा प्रयत्नांची शर्थ केली. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनाही पत्र पाठवून त्याने साकडे घातले होते. दुसरे तिसरे कोणी नाही तर जे भल्याभल्यांची बोलती बंद करतात असे तडफदार व्यक्तिमत्व असणारे खासदार उदयनराजे भोसलेही देखील राजकारणातील नेत्यांना आव्हान देणा-या ह्या अभिजीत बिचकुलेंना घाबरतात. त्यांनी असे साता-यात झालेल्या एका पत्रकार परिषदेत कबूलही केले होते. त्यानंतर मात्र सर्व लोक देखील अचंबित झाले होते.

आतापर्यंत अनेक निवडणुका अभिजीत बिचकुले याने लढल्या पण त्यांना कोणत्याच निवडणुकीत यश आले नाही हा भाग वेगळा. पण त्याने तरीही हार न मानता आपले प्रयत्न चालूच ठेवले. त्याचबरोबर मीच 2019 चा मुख्यमंत्री ठरवणार, असे धडधडीत वक्तव्य देखील त्याने केले होते. बरेच सामाजिक कार्य त्याने देखील केले. तसेच कविता बनविण्याचा छंद मनाशी बाळगून त्यांनी अनेक कविता तसेच गाणी लिहिली तसेच गायली आहेत.

बिग बॉस मराठी 2 च्या घरात अशा या अवलियाचे आगमन तर दिमाखात झाले. पण अनेक स्पर्धकांनी त्याला पाहताच किंवा त्याच्या बरोबर झालेल्या पहिल्या भेटीत नाके मुरडली. कदाचित त्याचे बोलणे अथवा बोलण्याची पद्धत आवडली नसावी. मात्र एकंदरीतच त्याचा घरातील वावर बघता हा घरात धमाल करणार आणि स्पर्धकांना वेडे करुन सोडणार हे मात्र नक्की.

Leave a Comment