पुन्हा एकदा म्हणा हमारा बजाज


देशातील प्रमुख दुचाकी वाहन कंपनी बजाज ऑटो पुन्हा एकदा त्यांची लोकप्रिय स्कूटर बाजारात आणण्याच्या तयारीत असून बजाज अर्बनाईट नावाने ही इलेक्ट्रिक स्कूटर या वर्षअखेरी अथवा २०२० च्या सुरवातीला बाजारात येईल असे समजते. या स्कूटरचे टेस्टिंग सुरु असताना ती लोकांनी पाहिली आहे. पूर्वीपासून बजाजच्या स्कूटर देशात लोकप्रिय ठरलेल्या होत्या आणि हमारा बजाज ही टॅगलाईन आजही अनेकांच्या चांगलीच स्मरणात असेल. बजाज ने त्यांच्या दुचाकी वाहन निर्मितीची सुरवात स्कूटरपासून केली होती मात्र नंतर मोटरसायकल्स लोकप्रिय होऊ लागल्यावर स्कूटरचे उत्पादन बंद करून फक्त मोटरसायकल्सचे उत्पादन सुरु ठेवले होते.

भारतीय बाजारात पुन्हा एकदा स्कूटरची मागणी वाढू लागली असून सुझुकी, यामाहा सारख्या कंपन्याही स्कूटर उत्पादन क्षेत्रात उतरल्या आहेत. तसेच अनेक कंपन्या आता इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन बाजारात आल्या आहेत. त्यामुळे बजाजनेही त्यांच्या जुन्या क्षेत्रात परतीचा निर्णय घेतला असल्याचे समजते. नवी स्कूटर बजाज ऑटो च्या इलेक्ट्रिक डिव्हिजनच्या माध्यमातून बजाज अर्बनाईट नावाने बाजारात येत आहे. या स्कूटरचे काही फोटो आणि व्हिडीओ लिक झाले आहेत.

कंपनीने या स्कूटरचे कोणतेच डिटेल जाहीर केलेले नसले तरी ही नवी स्कूटर जुन्या स्कूटर स्टाईलचीच असेल असे सांगितले जात आहे. ही स्कूटर रुंद फ्रंट आणि साईड पॅनल, मोठा रिअर व्हू सह आहे. चालकाला अधिक सुरक्षा मिळावी म्हणून इंटिरियर ब्रेकिंग सिस्टीम – आयबीएस दिली गेली आहे. मोठे इन्स्ट्रुमेन्ट् पॅनल, त्यात बॅटरी रेंज, ओडोमीटरची माहिती मिळेल. स्मार्टफोन, टर्न बाय टर्न निव्हीगेशन साठी इन्स्ट्रुमेन्ट् पॅनल ब्यू टूथ कनेक्टीव्हिटी सपोर्ट आहे.

Leave a Comment