अमेठीत राहुलचा पराभव आणि २१ आकडा अनोखा योगायोग


लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा पानिपत झाले आहे आणि त्याचवेळी अमेठी मतदारसंघाबाबतचा एक मजेदार योगायोग समोर आला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेस उत्तर प्रदेशात फारसा प्रभाव पाडू शकला नव्हता तरी रायबरेली आणि अमेठी हे मतदारसंघ नेहमीच कॉंग्रेसचे राहिले होते. यंदा रायबरेली सोनिया गांधीनी राखली असली तरी अमेठी राहुल याच्या हातातून निसटली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या या जागेवर स्मृती इराणी विजयी झाल्या आहेत.

या जागेचा आणि २१ आकड्याचे एक वेगळे नाते या संदर्भात चर्चिले जात आहे. १९६७ मध्ये अमेठी लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. तेव्हापासून कॉंग्रेसला या ठिकाणी पराभव पत्करावी लागलेली ही तिसरी वेळ. तीही प्रत्येक वेळी २१ वर्षांनी आलेली. १९७७ मध्ये इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि देशभर इंदिरा विरोधी लाट उसळली. तेव्हा कॉंग्रेसचे उमेदवार संजय गांधी अमेठीतून पराभूत झाले होते. त्यांना जनता पार्टीचे रवींद्र प्रताप सिंग यांनी हरविले होते.

त्यानंतर १९९८ मध्ये कॉंग्रेसचे कॅप्टन सतीश शर्मा यांना अमेठीतून पराभव पत्करावा लागला आणि त्यावेळी येथून भाजपचे संजय सिंग विजयी झाले होते. २०१४ मध्ये स्मृती इराणी याच राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढल्या पण त्यांना विजय मिळू शकला नव्हता आणि २०१९ मध्ये २१ वर्षे पूर्ण होताना कॉंग्रेसचे राहुल गांधी या मतदारसंघातून पराभूत झाले आहेत.

Leave a Comment