देशात फिर एकबार मोदी सरकार


नवी दिल्ली – आता बऱ्यापैकी सतराव्या लोकसभेचे चित्र स्पष्ट झाले असून भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने आतापर्यंत हाती आलेले कल आणि काही निकालांमध्ये 340 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर 300 पार मजल मारण्याच्या दिशेने भाजपनेही स्वबळावर कूच केली आहे. तर पुन्हा एकदा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएची दाणादाण उडाली असून, काँग्रेस आणि मित्रपक्ष 90 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. तर इतर पक्ष 110 जागांवर आघाडीवर आहेत.

लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून भाजप आणि मित्रपक्षांनी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच आघाडी घेतली होती. मतमोजणीला सुरुवात होऊन नऊ तास उलटले असून, 340 हून अधिक जागांपर्यंत भाजप आणि मित्रपक्षांची आघाडी पोहोचली आहे. दक्षिण भारत वगळता देशातील सर्वच भागातून भाजप आणि मित्रपक्षांना जोरदार समर्थन मिळाले आहे.

भाजपने महाआघाडीने कडवे आव्हान उभे केलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आपले वर्चस्व राखले असून, 58 हून अधिक जागांवर उत्तर प्रदेशात भाजपने आघाडी घेतली आहे. भाजप आणि मित्रपक्ष बिहारमध्येही 36 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 41 जागांवर शिवसेना भाजप युती आघाडीवर आहे.

भाजपने तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम बंगालमध्ये मोठी मुसंडी मारली आहे. येथील 42 मदारसंघांपैकी 18 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर कर्नाटकमध्ये 28 पैकी 24 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शहा यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये भाजपने पैकीच्या पैकी जागांवर यश मिळले आहे.

तसेच भाजपने उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, आसाम या राज्यांमध्येही घवघवीत यश मिळवले आहे. त्याशिवाय तेलंगणामध्येही ठळक उपस्थिती दर्शवताना भाजपने पाच जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, काँग्रेस आणि मित्रपक्षांची कामगिरी 2014 च्या तुलनेत सुधारली आहे. मात्र असे असले तरी यूपीएला 100 जागांचा टप्पा ओलांडता आलेला नाही. 2014 नंतर काँग्रेसला पुन्हा एकदा विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याइतपत जागा मिळवण्यामध्येही काँग्रेसचा अपयश येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment