दुबईमधील प्रेक्षक नाही पाहू शकणार अर्जूनचा ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’


उद्या बॉक्स ऑफिसवर अर्जुन कपूर अभिनित ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’ रिलीज होणार आहे. पण या चित्रपटाला दुबईतील अर्जुनच्या चाहत्यांना मात्र मुकावे लागणार आहे आणि यासाठी चित्रपटातील एक संवाद कारणीभूत ठरला आहे. ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या प्रदर्शनाला युएई सेन्सॉर बोर्डाने परवानगी नाकारली आहे. युएई सेन्सॉर बोर्डाने यात एक आक्षेपार्ह संवाद असल्याचे म्हटले आहे. युएई सेन्सॉर बोर्डाला ‘दुबई दहशतवाद्यांचा गड आहे,’ या आशयाचा संवाद खटकला आहे.

यासंदर्भात एका संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटात सबसे ज्यादा टेररिस्ट पाकिस्तान में या फिर दुबई में मौजूद है, असा एक डायलॉग आहे. युएई सेन्सॉर बोर्डाने या डायलॉगवर आक्षेप घेतला. शिवाय आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाला हा डायलॉग गाळल्यास परवानगी देऊ, अशी भूमिका घेतली. पण डायलॉग गाळण्यात ‘इंडियाज् मोस्ट वॉन्टेड’च्या निर्मात्यांनी कुठलाही रस दाखवला नाही. निर्मात्यांच्या मते, संशोधन व तथ्यांवर आधारित चित्रपटातील एक डायलॉग आहे. तो चित्रपटातून आम्ही गाळणार नाही. मग भलेही आमचा चित्रपट तिथे रिलीज न होवो, असे निर्मात्यांनी म्हटले.

‘रेड’ आणि ‘नो वन जेसिका किल्ड’ फेम दिग्दर्शक राज कुमार गुप्ता दिग्दर्शित हा चित्रपट एका सत्यघटनेवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे. फॉक्स स्टार स्टूडिओ, राजकुमार गुप्ता, मायरा करणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अर्जुनशिवाय अमृता पुरी आणि राजेश शर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Leave a Comment