तब्बल सात वर्षानंतर अॅमेझॉनला मिळाली डोमेनची मालकी !


सॅन फ्रान्सिस्को – ७ वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या एका गोष्टीसाठी ई-कॉमर्समधील दिग्गज कंपनी अॅमेझॉनला वाट पाहवी लागली. ती गोष्ट म्हणजे कंपनीचेच डोमेन आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना नुकतीच या डोमेनची मालकी मिळाली आहे.

२०१२ मध्ये डोमेनसाठी ई-कॉमर्समधील बलाढ्य कंपनी असलेल्या अॅमेझॉनने अर्ज केला होता. पण या डोमेनवर दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रसमुहाने तेथील नदीचे नाव अॅमेझॉन असल्याने आक्षेप घेतला होता. अॅमेझॉनच्या डोमेनबाबत गेल्या आठवड्यात इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाईनड नेम्स अँड नंबर्सच्या (आयसीएएनएन) मंडळाची बैठक घेण्यात आली. अॅमेझॉन कंपनीला या बैठकीत प्रस्तावाप्रमाणे डोमेन देण्याबाबत मान्यता देण्यात आली. त्या संदर्भात आयसीएएनएनचे अध्यक्ष आणि सीईओंनी पुढील कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.

जे नाव इंटरनेटवरील वेबसाईटला शोधण्यासाठी दिले जाते, त्याला डोमेन म्हटले जाते. आयसीएएनएनकडून हे डोमेन दिले जाते. अॅमेझॉनला यापूर्वी जरी डोमेन मिळाले असले तरी त्याबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याने कंपनीला नवे सबडोमेन घेण्यासारख्या अडचणी येत होत्या. अॅमेझॉनला यामधील अडचण दूर झाल्याने बुक्स डॉट अॅमेझॉन आणि अलेक्सा डॉट अॅमेझॉन अशी विविध सबडोमेन घेता येणार आहेत. तसेच डोमेनची पूर्ण मालकी कंपनीकडे राहणार आहे.

Leave a Comment